यादी तयार करण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2016 12:55 AM2016-08-07T00:55:59+5:302016-08-07T00:55:59+5:30
राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण २०११ ची माहिती वापरुन प्रधानमंत्री आवास योजना
प्रधानमंत्री आवास योजना : मंजुरीसाठी मांडणार ग्रामसभेत ठराव
अर्जुनी-मोरगाव : राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण २०११ ची माहिती वापरुन प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणसाठी लाभार्थ्यांच्या प्राधान्यक्रम याद्या तयार करण्याचे परिपत्रक ग्रामविकास व जलसंधारण विभागाने १ आॅगस्ट रोजी दिले आहे. त्यानुसार ्रतालुक्यात आवास योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या १३ एप्रिल २०१६ च्या पत्रातील सुचनेनुसार ग्रामपंचायत व संवर्गनिहाय प्राधान्यक्रम यादी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या यादीतील संपूर्ण कुटुंबाची घर निकषाबाबतची तालुकास्तरीय समितीने तात्काळ तपासणी करुन वस्तुस्थितीदर्शक अहवाल अभिप्रायासह १५ दिवसात जिल्हास्तरीय समितीकडे पाठवायचा आहे. संकेतस्थळावर उपलब्ध असलेली संवर्गनिहाय उपलब्ध प्राधान्यक्रम यादी ग्रामसभा आयोजित करण्याच्या तारखेपूर्वी ८ दिवस ग्रामपंचायतच्या सुचनाफलकावर लावावी असे निर्देश देण्यात आले आहेत.
ग्रामसभा १५ आॅगस्ट रोजी किंवा त्यादरम्यान आयोजित करावयाची आहे. क्षेत्रीयस्तरावरुन गटविकास अधिकारी, पं.स.प्रतिनिधींंनी उपस्थित राहून ग्रामसभेसाठी मार्गदर्शन व सहाय्य करावयाचे आहे. ग्रामसभेपुढे ठेवण्यात येणारे विषय दर्शविण्यात आले आहेत. यात ग्रामसभेने उपलब्ध प्राधान्यक्रम यादीमधील इतर संवर्गातून अल्पसंख्याक संवर्गातील जैन, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी व मुस्लिम कुटुंबाची यादी वेगळी करुन इतर व अल्पसंख्याक संवर्गाची स्वतंत्र यादी मूळ प्राधान्यक्रम यादीतील प्राधान्यक्रम अबाधित ठेवून तयार करणे, संवर्गनिहाय अनु.जाती, जमाती, अल्पसंख्याक व इतर प्राधान्यक्रम यादीमधून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणसाठी पात्र कुटुंबाची प्राधान्यक्रम यादी तयार करणे, संवर्गनिहाय अ.जा., जमाती, अल्प संख्याक व इतर प्राधान्यक्रम यादी तयार करणे, संवर्गनिहाय अ.जा., जमाती, अल्पसंख्याक व इतर प्राधान्यक्रम यादीमधून अपात्र कुटुंबाची नावे वगळून व त्याची कारणे नमूद करुन संवर्गनिहाय याद्या तयार करणे, ग्रामीण योजनेचा लाभ देण्यासाठी ग्रामसभेने सुचविलेल्या नवीन कुटुंबाची संवर्गनिहाय स्वतंत्र याद्या कारणासहीत तयार करणे आदिंचा समावेश आहे.
ग्रामसभेच्या ठरावाद्वारे मंजूर झालेल्या याद्यांना ग्रामसभा झालेल्या तारखेपासून ७ दिवस प्रसिद्धी द्यावयाची आहे. यात बदल, वगळणे आदी हरकती असल्यास यादी प्रसिद्धीची मुदत संपल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येईल. यासाठी तालुका व जिल्हास्तर अपील समिती गठित करण्यात आली आहे. तालुकास्तरीय समितीत अध्यक्ष गटविकास अधिकारी, सदस्य सचिव- विस्तार अधिकारी सांख्यीकी, सदस्य- नायब तहसीलदार व शाखा अभियंता यांचा समावेश आहे. यासाठी कामकाज सुरू झाल्याची माहिती गटविकास अधिकारी एन.आर. जमईवार यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)