फिरत्या लोकन्यायालयातून कायद्यांबाबत साक्षरता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 01:07 AM2018-03-10T01:07:34+5:302018-03-10T01:07:34+5:30
ऑनलाईन लोकमत
बोंडगावदेवी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबईच्या निर्देशानुसार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय गोंदिया, दिवाणी व फौजारी न्यायालय कनिष्ठ स्तर अर्जुनी मोरगाव व तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बोंडगावदेवी येथे फिरते लोकन्यायालय व कायदेविषयक साक्षरता शिबिर सार्वजनिक रंग मंदिरात घेण्यात आले.
उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून अर्जुनी मोरगाव न्यायालयाचे न्यायाधीश स्वप्नील रामटेके, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. श्रीकांत बबपुरकर, सचिव अॅड. तेजस कापगते, वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड. पोमेश्वर रामटेके, सुमन शहारे, सरपंच राधेशाम झोळे, ग्रामसेवक एल.एम. ब्राम्हणकर उपस्थित होते.
शिबिरात ग्रामस्थ व पक्षकारांना, ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला कायद्याची माहिती व्हावी, आपसातील वादासंबंधी न्यायालयीन प्रकरणे तडजोडीने गावात सोडवावे. दिवसेंदिवस न्यायालयीन प्रकरणांची संख्या वाढत आहे. पक्षकारांची न्यायालयातील पायपीट कमी व्हावी. मानसिक त्रास दूर व्हावा. प्रकरणांचा निपटारा गावातच दोन्ही पक्षकारांना समक्ष तडजोडीने करावा, यासाठी ‘न्यायालय आपल्या दारी’ हा उपक्रम राबवून गावागावात लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. या वेळी फिरते लोक न्यायालयात फौजदारी १२ व दिवाणी ४ असे १६ न्यायालयीन प्रकरणे घेण्यात आली.
प्रास्ताविक अॅड. पोमेश रामटेके यांनी मांडले. संचालन व आभार ग्रामसेवक ब्राम्हणकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी न्यायालयीन कर्मचारी जी.एम. सेवलकर, जी.सी. ठवकर, विलास हुमणे, हर्षल हर्षे, बीट अमलदार कन्नाके, पो.ह. बोरकर व ग्रामपंचायत कर्मचाºयांनी सहकार्य केले.
स्त्री भ्रूणहत्येचे पाप आपल्या माथी मारू नका
महिला सल्लागार सुमन शहारे म्हणाल्या, महिलांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी विविध कायद्यांचे पाठबळ आहे. स्वत:मधील आत्मविश्वास जागविण्याचे धाडस प्रत्येक महिलने करावे. महिलांवर झालेल्या अन्यायाचा निपटारा करण्यासाठी अहंपणा बाजूला सारुन तडजोडीसाठी आपल्या गावामध्ये आलेल्या लोकन्यायालयाचा फायदा घ्यावा. गर्भलिंग कायदा अंमलात आहे. महिलांनी गर्भलिंग निदान करु नये. स्त्रीभ्रूण हत्येचे पाप आपल्या माथी लावू नका. आजघडीला पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण कमी आहे. आयुष्य घडविणाºया शूर महिलांनी मुलींच्या जन्माचे स्वागत करावे, असे त्यांनी सांगितले.