साहित्य संमेलनाने युवा पिढीला नवी उर्जा प्राप्त होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:39 AM2018-02-11T00:39:04+5:302018-02-11T00:39:15+5:30
आजचा युवा समाजाचा आधारस्तंभ आहे. समाजाला दिशा देण्याची जबाबदारी युवकांची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टीचे होते. त्यांचे विचार सर्व दूर पोहोचविण्यासाठी साहित्य संमेलन हे प्रभावी माध्यम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : आजचा युवा समाजाचा आधारस्तंभ आहे. समाजाला दिशा देण्याची जबाबदारी युवकांची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टीचे होते. त्यांचे विचार सर्व दूर पोहोचविण्यासाठी साहित्य संमेलन हे प्रभावी माध्यम आहे. भगवान बुद्धांची शांती आणि बाबासाहेबांची रक्तविरहीत क्रांती आणि त्यांच्या समग्र लेखणाला आत्मसात करणे हेच खरे साहित्य होय. अशाच साहित्य संमेलनाने युवा पिढीला नवी उर्जा प्राप्त होते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी केले.
युगपुरुष युवा मंच आयोजित सिध्दार्थ बुध्द विहार व सारीपुत्र बुध्द विहार यांचे संयुक्त विद्यमाने मातोश्री रमाई आंबेडकर यांचे जयंती दिनाचे औचित्य साधून नामदेव ढसाळ साहित्य नगरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय पिंपळगाव (खांबी) येथे आयोजित एक दिवसीय परिवर्तनशिल साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी बाजार समिती उपसभापती लायकराम भेंडाकर होते. सहउद्घाटक म्हणून पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर होते. याप्रसंगी जिल्हा परिषद माजी सभापती उमाकांत ढेंगे, सरपंच उर्मिला मेश्राम, नगर पंचायत उपाध्यक्ष विजय कापगते, बाजार समिती संचालक व्यंकट खोब्रागडे, खरेदी विक्रीचे संचालक लैलेश शिवणकर प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम भगवान बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मातोश्री रमाई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिप प्रज्वलीत करुन साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. स्वागत समारंभानंतर गावातील समता सैनिक दलाच्या सैनिकांनी उत्कृष्ट पथसंचलन केले. यानंतर ‘आम्ही भिमाची लेकर’ हा नागपूर प्रस्तुत भिमबुद्ध गीतांचा बहारदार कार्यक्रम घेण्यात आला.
दुसऱ्या सत्रात ‘बहुजन समाजाच्या महिलांच्या शोषनास वर्तमान शैक्षणिक धोरण जबाबदार का?’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. या परिसंवादात अनेक मान्यवरांनी भाग घेऊन आपले विचार प्रकट केले. रात्री ९ वाजता सप्त खंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचा जाहिर किर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सत्यपाल महाराज यांनी आपल्या अनोख्या शैलीत कुप्रथा अंधश्रध्दा, वाईट व्यसन यावर प्रहार करुन युवा पिढीने देश समृद्ध करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करुन हजारो प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या एकदिवसीय साहित्य संमेलनात कवी, साहित्यीक व विशेष मान्यवरांनी हजेरी लावून हा संमेलन यशस्वीरित्या पार पाडण्यात सहकार्य केले. कार्यक्रमासाठी युवा मंच, सिध्दार्थ व सारीपुत्र बुद्ध विहार समितीच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.