२७ गावांचा भार दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:34 AM2021-08-25T04:34:36+5:302021-08-25T04:34:36+5:30
मुंडीकोटा : तिरोडा पोलीस स्टेशनअंतर्गत मुंडीकोटा येथे पोलीस चौकी बऱ्याच वर्षांपासून ग्रा.पं. कार्यालयाच्या जुन्या इमारती स्थापन करण्यात आली. मुंडीकोटा ...
मुंडीकोटा : तिरोडा पोलीस स्टेशनअंतर्गत मुंडीकोटा येथे पोलीस चौकी बऱ्याच वर्षांपासून ग्रा.पं. कार्यालयाच्या जुन्या इमारती स्थापन करण्यात आली. मुंडीकोटा परिसरातील २७ खेडे गावांची धुरा या पोलीस चौकीवर आहे. या ठिकाणी एक हवालदार व एक पोलीस शिपाई असे दोन जण कार्यरत आहेत. मात्र, २ लोकांना २७ गावे सांभाळण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागते.
मुंडीकोटा हे गाव केंद्राचे ठिकाण असून या गावाची लोकसंख्या ३५०० आहे. या गावी दर सोमवारी आठवडी बाजार भरत असतो. प्राथमिक आरोग्य केंद्र, दोन बँक, चार राइस मिल, महाविद्यालय व शाळा आहेत. छोटीशी व्यापारपेठ आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची देवाण-घेवाण करण्याकरिता दिवसभर वर्दळ असते. सोमवारी आठवडी बाजाराच्या दिवशी पोलीस चौकी बंदच असते. येथील दोन पोलीस बाहेर गावी तपासासाठी गेले असता चौकी बंदच असते. या चौकीला नेहमीच कुलूप लागेला दिसतो. या ठिकाणी एकही पोलीस राहत नाहीत. एखादा व्यक्ती बाहेर गावावरून तक्रार देण्याकरिता आला असता चौकी बंद असल्यामुळे आल्या पावलीच परत जावे लागते. तिरोडा पोलीस स्टेशन २० किमी अंतरावर जाऊन व एसटीचा भुर्दंड भरावा लागतो. मग ही पोलीस चौकी कशासाठी? असा प्रश्न परिसरातील नागरिक करीत आहेत. ही चौकी या गावांसाठी शोभेचे ठरली आहे. या परिसरात अवैध धंद्याच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे याला आळा घालण्याठी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरण्याची गरज आहे.
....................