दोन पोलिसांवर २७ गावांचा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:20 AM2021-07-02T04:20:32+5:302021-07-02T04:20:32+5:30
मुंडीकोटा येथे १९९२ मध्ये पोलीस चौकीची स्थापना करण्यात आली. या चौकीत मुंडीकोटा परिसरातील २७ खेडे गावांचा समावेश आहे; पण ...
मुंडीकोटा येथे १९९२ मध्ये पोलीस चौकीची स्थापना करण्यात आली. या चौकीत मुंडीकोटा परिसरातील २७ खेडे गावांचा समावेश आहे; पण २७ गावे सांभाळण्याकरिता दोन पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. पोलीस उपनिरीक्षक कधी येतात तर कधी येत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच २ पोलीस कर्मचारी कार्यरत असतात. मग २ पोलीस काय करणार, दोन पोलीस गावी तपासात गेले असता ही चौकी बंद असते. या चौकीला कुलूप लावलेले दिसत असते. एखादी व्यक्ती बाहेर गावावरून तक्रार देण्याकरिता आली तर त्याला चौकी बंद असल्यामुळे आल्यापावलीच परत जावे लागते. तर नाइलाजास्तव त्याला २० कि.मी. अंतरावर तिरोडा पोलीस स्टेशन येथे जावे लागते. एस.टी. बसचा भुर्दंड भरावा लागतो. मुंडीकोटा गावाची लोकसंख्या ३५०० हजार आहे. हे गाव केंद्राचे ठिकाण आहे. दर सोमवारी आठवडी बाजार भरत असतो. प्राथमिक आरोग्य केंद्र व २ बँक आहेत. या गावाबाहेर गावातील देवाण-घेवाण करण्यासाठी अनेक नागिरकांची दिवसभर वर्दळ असते. पोलीस अधीक्षकांनी याची दखल घेऊन येथे चार पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी परिसरातील गावकऱ्यांनी केली आहे.
....................