पशुवैद्यकीय दवाखान्यांचा भार कंपाऊंडरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:16 AM2018-08-11T00:16:44+5:302018-08-11T00:17:53+5:30
संपूर्ण सालेकसा तालुका ग्रामीण भागात मोडत असून या तालुक्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : संपूर्ण सालेकसा तालुका ग्रामीण भागात मोडत असून या तालुक्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे. पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने कंपाऊंडरवरच या दवाखान्याचा भार असल्याचे चित्र आहे. परिणामी पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
तालुक्यात पशुपालन व्यवसाय आणि दुग्ध उत्पादन व्यवसाय करणारे शेतकरी व पशुपालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नसल्याने नवीन तंत्रज्ञान अद्यापही त्यांच्यापासून कोसो दूर आहे. शेतकरी व शेती पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन करणारा वर्ग आर्थिकदृष्ट्या फार मागासलेला आहे. या विभागाकडे लोकप्रतिनिधीसह इतर जागरुक वर्गाचे लक्ष नसल्याने पशुपालन क्षेत्रात काहीच प्रगती झालेली नाही. तर संबंधीत विभागातील अधिकारी कर्मचारी सुद्धा पशुपालकांना मार्गदर्शन करीत नाही. शासनांच्या योजनांची माहिती सुद्धा पशुपालकांपर्यंत पोहचत नाही.
सालेकसा तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ ५९ हजार ९५९ हेक्टर असून यापैकी १७ हजार ७३९ हेक्टर जमिनीवर शेती केली जाते. तर ४२ हजार हेक्टरच्या जवळपास वनभूमी आहे. त्यामुळे पशुसाठी गवताचे कुरण उपलब्ध आहे. शेतकरी शेती व्यतिरीक्त शेतीपूरक व्यवसाय म्हणून गायी, म्हशी, शेळीपालन या पशुची आवडीने पालन पोषण करीत असतो. त्यातून गायी आणि म्हशीचा दूधाचा व्यवसाय करतात. एकंदरीत पशुपालनासाठी अतिशय पोषक व अनुकूल वातावरण आहे. तालुक्यातील पशुपालकांना संकरीत गायी, म्हशीचा लाभ सुद्धा मिळत नाही.
सालेकसा तालुक्यात सालेकसा, साकरीटोला, गोर्रे, पांढरवाणी, पिपरिया आणि विचारपूर या गावामध्ये ‘अ’ श्रेणीचे पशू दवाखाने आहेत. तर कावराबांध कोटरा, दरेकसा व इतर ठिकाणी ‘ब’ श्रेणीचे दवाखाने आहेत. परंतु सांगायला जे दवाखाने ‘अ’ श्रेणीचे असले तरी ते सर्व दवाखाने कंपाऊडर आणि चपराशांच्या भरोशावर सुरू आहेत. मागील सात-आठ वर्षांपासून सालेकसा येथे पशुसंवर्धन विकास अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. तर प्रभारी पशू चिकीत्सकाच्या भरोशावर तालुक्याचा कारभार सुरू आहे.
पांढरवाणी आणि पिपरीया येथील ‘अ’ श्रेणी दवाखान्यात मागील कित्येक वर्षापासून पशू चिकीत्सकच नाही. साकरीटोला येथे डॉ. कोटांगले कार्यरत होते. परंतु त्यांची बदली झाली. गोर्रे येथे डॉ.पालीमकर आणि विचारपूर येथील डॉ.शिंदे या दोन्ही महिला चिकित्सक होत्या, परंतु त्यांची सुद्धा बदली झाली. या ठिकाणी दुसरे चिकित्सक अद्यापही आले नाही. आता पूर्ण ‘अ’ श्रेणीचे सर्व दवाखाने चपराशी सांभाळत आहेत. त्यामुळे एखाद्यावेळेस योग्य उपचार न झाल्यास जनावरे दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
योजनेच्या लाभापासून वंचित
शेतकºयांना शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसायाकडे वळविण्यासाठी तसेच बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी दुग्ध उत्पादनासाठी गायी व म्हशी अनुदानावर दिल्या जातात. वराह पालन, कुक्कुट पालन, शेळीपालन आदीसाठी अनुदान देण्याची तरतूद आहे. पशुखाद्य, औषध इत्यादीसाठी सुद्धा अनुदान किंवा थेट मदत देणाºया योजना आहेत. परंतु तालुक्यातील शेतकºयांना याचा लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे.
योजनांसंबंधी जनजागृतीचा अभाव
शासनाकडून पशुपालकांसाठी दुधाळ जनावरे, शेळ्या, मांसल कुक्कुटपालन, अनुसूचित जाती जमातीसाठी ७५ टक्के अनुदानावर आणि इतर वर्गासाठी ५० टक्के अनुदानावर मिळण्याची सोय आहे. तसेच पशुखाद्य, वैरण बियाणे, कुक्कुट पिल्लाचे वाटप १०० टक्के अनुदानावर असते. परंतु या योजनाचा प्रचार-प्रसार संबंधित विभाग करीत नसल्याने पशुपालक यापासून वंचित आहेत.
एकीकडे सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न दाखवित आहे. परंतु शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी महत्वाचा घटक असलेला पशुपालन व्यवसाय आणि दुग्ध उत्पादन व्यवसाय असून याकडे दुर्लक्ष करीत आहे.
-मनोज विश्वकर्मा
माजी उपसभापती पं.स. सालेकसा.