उभ्या ट्रकवर धडकले एलसीबीचे वाहन; पोलीस ठार, दोनजण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2022 01:15 PM2022-12-08T13:15:36+5:302022-12-08T13:50:06+5:30
ढिमरटोली येथील घटना
गोंदिया : रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे वाहन धडकल्याने एक पोलिस कर्मचारी ठार, तर दोन गंभीर जखमी झाले. ही घटना ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ढिमरटोली येथील विकास राइस मिलसमोर ७ डिसेंबरच्या पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस जुगारावर कारवाई करण्यासाठी अर्जुनी-मोरगाव येथे गेले होते. रात्री अर्जुनी-मोरगाववरून गोंदियाकडे परतत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे वाहन (एमएच ३५ एजी ७५७८) हे रस्त्यावर उभे असलेल्या ट्रक (एमएच ४० वाय ५६८६) वर धडकले. यात पोलिस शिपाई विजय मानकर (बक्कल नंबर २०९५) यांचा मृत्यू झाला, तर पोलिस उपनिरीक्षक गोपाल कापगते व पोलिस हवालदार तुलसीदास लुटे (बक्कल नंबर १२३१) हे गंभीर जखमी झाले. गंभीर जखमींना गोंदियाच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस हवालदार सुरेंद्र खोब्रागडे यांच्या तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोलिसांनी भा.दं.वि.च्या कलम ३०४ अ ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मुलाचे प्रेमही मिळू शकले नाही
या अपघातात मृत्यू झालेल्या विजय मानकर यांना आठवडाभरापूर्वी पुत्ररत्न प्राप्त झाले. चिमुकल्याचे नामकरण होण्याच्या आधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि विजयची प्राणज्योत मालवली. चिमुकल्याचे प्रेमही विजयला मिळू शकले नाही. परिणामी, हळहळ व्यक्त होत आहे.
केटीएसमध्ये दिली सलामी
कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी विजय मानकर यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर केटीएस येथेच जिल्हा पोलिसांनी सात फेऱ्या झाडून त्यांना सलामी दिली. त्यानंतर त्यांचे पार्थिव रुग्णवाहिकेने त्यांच्या स्वगावी परसोनी, जि. यवतमाळ येथे नेण्यात आले.