गावकऱ्यांनी ठोकले शाळेला कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2016 01:45 AM2016-07-08T01:45:26+5:302016-07-08T01:45:26+5:30
शिक्षकांची मागणी करून शिक्षक दिले जात नसल्याने अखेर संतप्त गावकऱ्यांनी ग्राम दवनीवाडा येथील जिल्हा परिषद हायस्कूल ...
दवनीवाडा जि.प.शाळा : गावकऱ्यांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा
परसवाडा : शिक्षकांची मागणी करून शिक्षक दिले जात नसल्याने अखेर संतप्त गावकऱ्यांनी ग्राम दवनीवाडा येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाला अखेर गुरूवारी (दि.५) कुलूप ठोकले. विशेष म्हणजे प्रकरणावर तोडगा निघाला नसल्याने हे आंदोलन भडकण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
गोंदिया जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत येत असलेले दवनीवाडा येथील जि.प. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय ब्रिटीश कालीन आहे. शाळेने चांगले नाव लौकीक केले आहे. पण जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष व पदाधिकाऱ्यांच्या राजकारणने या शाळेची दुर्दशा व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या शाळेत वर्ग ५ ते १२ वीपर्यंत कला व विज्ञान शाखेत विद्यार्थी शिक्षण घेतात. पण शाळेत पाच-सहा वर्षापासून शिक्षकांची कमतरता आहे. यासाठी शाळा समिती व गावकरी शिक्षकांची मागणी करीत दरवर्षी निवेदन देतात. मात्र एकही शिक्षक दिले जात नाही. यामुळे मुले-मुली खासगी शाळेत धाव घेत आहेत.
जिल्हा परिषदेचे याकडे सपशेल दुर्लक्ष असल्याने गावकऱ्यांनी गुरूवारी (दि.७) शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता व त्यानुसार शाळेला कुलूप ठोकण्यात आले. गावकऱ्यांनी एकही शिक्षकाला आत जाऊ दिले नाही. तर विद्यार्थीही बाहेर ठाम राहिले. प्रकरणी मुख्याध्यापकाने गटशिक्षणाधिकाऱ्यांना फोनद्वारे सांगितले. यावर दुपारी ३ वाजता गटशिक्षणाधीकारी डोये आले व त्यांनी दोन शिक्षकांना तिरोडा वरुन फोनवरुन बोलावले. तात्पुरती व्यवस्था म्हणून त्यांना बोलाविल्याचे डोये यांनी सांगीतले. तसेच पिरेडनुसार त्यांना पगार दिला असल्याचेही त्यांनी सांगीतले. मागील वर्षीही शाळा व्यवस्थापनाने शिक्षक ठेवले पण त्यांचे वेतन अजूनही दिले नाही. अखेर शाळेतील शिक्षक, पालक यांनी आपल्या जवळून दिले असल्याचे पंचायत समिती सदस्य गुड्डू लिल्हारे यांनी सांगितले. प्रकरणी मार्ग निघाला नसून तिव्र आंदोलनाचा इशारा गुड्डू लिल्हारे, सरपंच तिजा मस्करे, नीरज सोनेवाने, राजेश उरकुडे, लांजेवार, धपाडे, नागपुरे व पालकवर्गाने दिला आहे. विशेष म्हणजे जोपर्यंत शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत शाळेत बसणार नाही असा पवित्रा विद्यार्थी वर्गानेही घेतला आहे. (वार्ताहर)