जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरचे कुलूप पुन्हा उघडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:31 AM2021-02-24T04:31:31+5:302021-02-24T04:31:31+5:30
गोंदिया : मागील वर्षी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर जवळपास १८ कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले. पण रुग्ण संख्येत ...
गोंदिया : मागील वर्षी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर जवळपास १८ कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले. पण रुग्ण संख्येत घट झाल्यानंतर हे कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले. त्यामुळे सद्यस्थितीत केटीएस आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दोनच कोविड वार्ड सुरु आहेत. मात्र मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढत असल्याने येत्या दोन दिवसात गोंदिया येथे एक किंवा दोन कोविड केअर सुरु करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. त्यामुळे पाच महिन्याच्या कालावधीनंतर या कोविड केअर सेंटरचे कुलूृप पुन्हा उघडण्यात येणार आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या जिल्ह्यात नाहीच्या बरोबरीत होती. त्यामुळे कोविड केअर सेंटर सुरु ठेवून आरोग्य विभागाला आर्थिक भुर्दंड बसत होता. तर आरोग्य कर्मचारी सुद्धा व्यस्त राहत होते. त्यामुळेच हे कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले होते.
....
कोरोनाचे एकूण रुग्ण - १४,३५५
बरे झालेले रुग्ण : १४,०९४
कोरोनाचे एकूण बळी : १८५
........
शहरातील कोविड केअर सेंटर रुग्ण
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय १२
केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय २२
..........................
गोंदिया तालुका होतोय हाॅटस्पॉट
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आहे. मात्र गोंदिया तालुक्यातील कोरोना बाधितांचा आलेख सातत्याने वाढत आहे. सद्यस्थितीत गोंदिया तालुक्यात ६२ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे. तर मागील दोन दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या १० ते १२ वाढत आहे. त्यामुळे गोंदिया तालुक्याची वाटचाल पुन्हा कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याच्या दिशेने सुरु असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तालुकावासींनी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे.
.......
कोट :
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आहे. त्यामुळे तूर्तास तरी बंद केलेले सर्वच कोविड केअर सेंटर उघडण्यात येणार नाही. मात्र पुढील एक दाेन दिवसात गोंदिया शहरातील दोन कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येणार आहे. रुग्ण संख्या वाढल्यास यावर त्वरित निर्णय घेण्यात येईल.
- डॉ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी.
.........
लॉकडाऊन परवडणारे नाही
काही जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. तर काही जिल्ह्यातील नागरिक अजूनही बिनधास्तपणे वावरत आहे. मात्र हा बिनधास्तपणा आणि निष्काळजीपणा आपल्यासाठी धोकादायक ठरु शकतो. रुग्ण संख्या वाढल्यास लॉकडाऊन करण्यात आल्यास ते कुणालाच परवडणारे नाही त्यामुळे सर्वांनी काळजी घेऊन जबाबदारीने वागणे हाच यावरील एकमेव उपाय आहे.