अनलॉकमध्येही मंदिरांना लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:38 AM2021-06-16T04:38:48+5:302021-06-16T04:38:48+5:30
गोंदिया : कोरोनामुळे देशासह जिल्ह्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये आता शिथिलता देण्यात आली आहे. असे असले तरी, भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या ...
गोंदिया : कोरोनामुळे देशासह जिल्ह्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये आता शिथिलता देण्यात आली आहे. असे असले तरी, भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मंदिरांना अद्यापही लॉक लागूनच आहे. यामुळे भाविकांना बाहेरूनच दर्शन घ्यावे लागत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत ७ महिने मंदिर बंद होते. दिवाळीनंतर मंदिराचे दरवाजे उघडण्यात आल्याने भाविकांना थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला होता. यातही शासनाने नियम लावल्याने भाविकांना दर्शन मिळण्यास अडचण जात होती. यातच फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट आली व पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आले. ही लाट पहिल्या लाटेपेक्षाही अधिक तीव्र होती. यामुळे मंदिरांची दारे पुन्हा बंद करण्यात आली. परंतु ७ जूनपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली असली, तरी मंदिराची दारे अद्यापही बंदच आहेत. यामुळे भाविकांना मंदिराच्या आत जाऊन दर्शन घेणे शक्य होत नाही.
दररोज पूजा करण्यासाठी मंदिर काही वेळासाठीच उघडण्यात येत आहे. यानंतर परत मंदिर बंद करण्यात येत आहे. सामान्य दिवसात मंदिरामध्ये भाविकांच्या रांगा लागतात. अनेक भाविक मंदिरात चढावा चढवितात. यावरच पुजारी गुजारा करतात. परंतु लॉकडाऊनमुळे हा प्रकार बंद पडला आहे. भाविक दर्शनासाठी येत नसल्याने मंदिर परिसर सुनसान दिसून येत आहेत.
अनेकांचा रोजगार हिरावला
मंदिराच्या बाहेर अनेकांनी हार, फुले, मिठाई, पूजा साहित्य, प्रसाद, मूर्ती व फोटो विकण्याचा व्यवसाय लावला आहे. यामुळे त्यांना रोजगार मिळाला होता. परंतु दीड वर्षापासून मंदिरे बंद आहेत. यामुळे त्यांचा रोजगार हिरावला आहे. यामुळे दुकानदारांनी अन्य पर्याय शोधले आहेत. याशिवाय मंदिरात येणाऱ्या भाविकांकडून चढविण्यात येणाऱ्या चढाव्यावर पंडितांचा गुजारा होतो; मात्र भाविक येत नसल्याने पुजारीही अडचणीत आले आहेत.