५०० ग्रामपंचायतींना ठोकले कुलूप
By admin | Published: July 2, 2014 11:20 PM2014-07-02T23:20:33+5:302014-07-02T23:20:33+5:30
सध्या सर्वत्र आंदोलनांचे सत्र सुरू असताना ग्रामसेवकांनीही कामबंद आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. राज्यस्तरीय आंदोलनांतर्गत ग्रामसेवकांनी जिल्ह्यातील सुमारे ५०० ग्रामपंचायतींना बुधवारी कुलूप ठोकले.
ग्रामसेवकांचे आंदोलन : काम बंद ठेवून कक्ष अधिकाऱ्यांना दिल्या किल्ल्या
गोंदिया : सध्या सर्वत्र आंदोलनांचे सत्र सुरू असताना ग्रामसेवकांनीही कामबंद आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. राज्यस्तरीय आंदोलनांतर्गत ग्रामसेवकांनी जिल्ह्यातील सुमारे ५०० ग्रामपंचायतींना बुधवारी कुलूप ठोकले. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकाऱ्यांना दिले असून ग्रामपंचायतच्या चाब्या कक्ष अधिकाऱ्यांना सुपूर्द केल्या आहेत.
ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची वेतन त्रुटी दूर करणे, ग्रामपंचायत स्तरावर नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणे, कंत्राटी ग्रामसेवक ाचा सेवाकाळ कंत्राटी शिक्षकाप्रमाणे सेवेत लागलेल्या तारखेपासून धरणे, २० ग्राम पंचायतीमागे एक विस्तार अधिकार पद निर्माण करणे, प्रवास भत्ता पगारासोबत तीन हजार रूपये लागू करणे, सर्व संवर्गाकरिता बदलीचे धोरण एक ठेवणे, शासनाच्या चुकीमुळे कंत्राटी ग्रामसेवकांना वेळेवर आदेश न मिळाल्यामुळे पेंशन योजनेचा लाभ देण्याबाबत सहानुभुतीपूर्वक निर्णय घेणे आदी मागण्यांसाठी ग्रामसेवकांनी राज्यस्तरीय कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनांतर्गत ग्रामसेवकांनी १ जुलै रोजी कार्यालयीन काम आटोपून कार्यालयाला कुलूप ठोकले. या आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे ३१० ग्रामसेवक सहभागी असून त्यांनी सुमारे ५१० ग्रामपंचायत कार्यालयांना कुलूप ठोकले. तालुकास्तरावर ८४ ग्रामपंचायतींना कुलूप ठोकण्यात आले. सध्या ग्रामसेवक पंचायत समितीत धरणे आंदोलनावर बसले असून येत्या ११ जुलै रोजी नागपूर विभागातील ग्रामसेवक मुंबई येथे धरणे आंदोलनावर बसणार असल्याची माहिती संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश रूद्रकार यांनी दिली.
अर्जुनी/मोरगाव - महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या वतीने २ जुलैपासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले. बुधवारला तालुक्यातील ग्रामसेवकांनी पंचायत समिती कार्यालयासमोर बसून आंदोलनाची सुरुवात केली. ग्रामसेवकांनी तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतच्या चाब्या व शिक्के खंडविकास अधिकाऱ्यांना सुपूर्द केले.
सडक/अर्जुनी - महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने सडक/अर्जुनी तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीच्या कंत्राटी ग्रामसेवकांना वगळून इतरांनी चाब्या खंडविकास अधिकारी यांच्याकडे सोपविल्याची माहिती तालुकाध्यक्ष कमलेश बिसेन यांनी दिली. सदर आंदोलनात तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांचा सहभाग असून ३ जुलैपासून मुंबई येथे विभागनिहाय धरणे आंदोलन होणार असल्याची माहिती अध्यक्ष कमलेश बिसेन यांनी दिली. (शहर प्रतिनिधी)