शिक्षकाच्या मागणीसाठी शाळेला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:13 AM2018-08-29T00:13:18+5:302018-08-29T00:13:40+5:30
येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ विद्यालयात विज्ञान विषयाच्या शिक्षकाची नियुक्ती न करण्यात आल्याने शालेय व्यवस्थापन समिती व पालकांनी मंगळवारी (दि.२८) सकाळी शाळेला कुलूप ठोकले होते. दरम्यान गटशिक्षणाधिकारी भोयर यांनी आठ दिवसात शिक्षकाची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शाळेचे कुुलूप उघडण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ विद्यालयात विज्ञान विषयाच्या शिक्षकाची नियुक्ती न करण्यात आल्याने शालेय व्यवस्थापन समिती व पालकांनी मंगळवारी (दि.२८) सकाळी शाळेला कुलूप ठोकले होते. दरम्यान गटशिक्षणाधिकारी भोयर यांनी आठ दिवसात शिक्षकाची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शाळेचे कुुलूप उघडण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार मागील तीन वर्षापासून येथील जि.प.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासंदर्भात २४ आॅगस्टला प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी उल्हास नरड, जि.प.अध्यक्ष, कार्यकारी अधिकारी, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांना शालेय व्यवस्थापन समिती व पालकांच्या वतीने निवेदन देण्यात आले. मात्र यानंतरही कुठलाच तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे मंगळवारी सकाळी शालेय व्यवस्थापन समिती व पालकांनी शाळेला कुलूप ठोकले.
विद्यालयात मागील तीन वर्षापासून अनेक जागा रिक्त आहेत. या शाळेतील शिक्षकांची इतरत्र बदली झाली. परंतु त्यांच्या जागी नवीन शिक्षक आले नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शाळेला कुलूप ठोकल्याची माहिती मिळताच आमगावचे गटशिक्षणाधिकारी वाय.सी.भोयर यांनी सकारात्मक भूमिका घेवून सात दिवसात शिक्षक पाठविण्याचे आश्वासन दिले. यानंतर शालेय व्यवस्थापन समितीने आंदोलन मागे घेत शाळेला ठोकलेले कुलूप उघडले. या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद पाऊलझगडे, सदस्य आनंद मेश्राम, गिरधारी डिब्बे, रविना डोंगरे, रेखा खोब्रागडे, योगेश रामटेके, प्रणव खोब्रागडे, नरेश गुप्ता, मिलींद राहूलकर, भरतलाल ठाकरे, करण बागडे, अनिल तुमसरे, ताराचंद सोनवाने, जयचंद डोंगरे, दिलीप नेवारे, सुखदेव बघेले, स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.