शिक्षकाच्या मागणीसाठी ेशाळेला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 12:16 AM2018-08-23T00:16:34+5:302018-08-23T00:17:46+5:30
देवरी तालुक्यातील आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त क्षेत्रातील ककोडी येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने संतापलेल्या पालक व गावकऱ्यांनी मंगळवारी (दि.२१) शाळेला कुलूप ठोकले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ककोडी : देवरी तालुक्यातील आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त क्षेत्रातील ककोडी येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने संतापलेल्या पालक व गावकऱ्यांनी मंगळवारी (दि.२१) शाळेला कुलूप ठोकले.जोपर्यंत शिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार नाही तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडू देणार अशी भूमिका पालक व गावकऱ्यांनी घेतली आहे.
शासकीय काम आणि महिनाभर थांब या आजाराची लागण आता जिल्ह्यातील शिक्षण विभागाला सुध्दा झाल्याचे चित्र आहे.एकीकडे जिल्ह्यात काही ठिकाणी शिक्षक अतिरिक्त असल्याची ओरड होत असताना मागील तीन महिन्यापासून ककोडी येथील शाळेत शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्च चिन्ह निर्माण झाले आहे. आदिवासी बहुल व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहे. मात्र पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ककोडी येथे जि.प.हायस्कूल १९६८ मध्ये सुरू करण्यात आले. या शाळेने अनेक डॉक्टर इंजिनियर, शिक्षक घडविले. मात्र आता शिक्षण विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे शाळेची वाट लागली आहे. शिक्षकांची पदे रिक्त आहेत. जे शिक्षक कार्यरत आहेत ते सुध्दा अपडाऊन करीत असल्याने वेळेत शाळेत पोहचत नसल्याची पालकांची ओरड आहे. यंदा शैक्षणिक सत्राला सुरूवात होवून ७० दिवसांचा कालावधी लोटला मात्र अद्यापही दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली नाही. शाळेत आधीच शिक्षकाची गरज असताना गणित विषयाचे शिक्षक के.बी.बन्सोड यांची बदली करण्यात आली. मात्र त्यांच्या जागी अद्यापही दुसºया शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे मागील तीन महिन्यापासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शालेय व्यवस्थापन समितीने ८ आॅगस्टला जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र देवून शिक्षकाची नियुक्ती न केल्यास २१ आॅगस्टला शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. मात्र यानंतरही शिक्षण विभागाने दखल न घेतल्याने मंगळवारी (दि.२१) शालेय व्यवस्थापन समिती, पालक आणि गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले. शिक्षण विभागावर रोष व्यक्त केला. जोपर्यंत शिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नाही अशी भूमिका सुध्दा येथील पालकांनी घेतली आहे. विशेष म्हणजे मागील पाच वर्षांपासून शाळेत लिपिक नाही. त्यामुळे त्यांचे काम सुध्दा मुख्याध्यापकाला करावे लागत आहे.
आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने त्वरीत ककोडी येथील शाळेत शिक्षकाची नियुक्ती न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. असा इशारा उपसभापती गणेश सोनबोईर, सरपंच रियाज खान, नरेंद्र सांडील, मनेंद्र मोहबंशी, अशोक नांदनकर, अमरदास सोनबोईर, मनीष मोटघरे, मधू उकनकर, कुलेसर प्रधान, किरण जांभूळकर, रवि सावरे, जगन कपूरडेहलिया, कामेश्वर बंसोड यांनी दिला आहे.
गावकऱ्यांच्या पत्राकडे दुर्लक्ष केले
ककोडी येथील शालेय व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी शाळेत शिक्षकाचीे नियुक्ती करण्यात यावी. या मागणीचे पत्र पंधरा दिवसांपूर्वी शिक्षण विभागाला दिले होते. त्यात कुलूप ठोको आंदोलनचा इशारा दिला होता. मात्र यानंतर शिक्षण विभागाने पत्राची दखल घेतली नाही.