कालीमाटीच्या हायस्कूलला ठोकणार कुलूप
By admin | Published: September 14, 2016 12:17 AM2016-09-14T00:17:11+5:302016-09-14T00:17:11+5:30
तालुक्यातील कालीमाटी येथील विद्या प्रसारण हायस्कूलचे अतिरिक्त ठरविण्यात आलेले शिक्षक डी.एच. रहांगडाले यांना अतिरिक्त न ठरवता
गोरेगाव : तालुक्यातील कालीमाटी येथील विद्या प्रसारण हायस्कूलचे अतिरिक्त ठरविण्यात आलेले शिक्षक डी.एच. रहांगडाले यांना अतिरिक्त न ठरवता त्याच हायस्कूलमध्ये ठेवण्यात यावे, यावरुन पालक-शिक्षक समिती, गावकरी हे १४ सप्टेंबरला शाळेला कुलूप ठोकतील, असा इशारा दिला आहे. याची तक्रार गोरेगाव पोलीस स्टेशन, शिक्षणाधिकारी, सभापती शिक्षण व आरोग्य जि.प. गोंदिया यांना दिल्याची माहिती सरपंच शिवकुमार रहांगडाले यांनी दिली.
दिलेल्या माहितीनुसार, विद्या प्रसारण हायस्कूल येथे वर्ग ८ ते १० वी पर्यंत वर्ग असून २६४ पर्यंत पटसंख्या आहे. ६ वर्गातून त्यांना शिक्षण देण्यात येत आहे. शासनाच्या धोरणानुसार ३ वर्गावर १ शिक्षक याप्रमाणे गणित व विज्ञान या विषयासाठी २ शिक्षक कार्यरत होते. पण ९ सप्टेंबरला डी.एच. रहांगडाले यांना अतिरिक्त ठरवून चुटीया या शाळेत हलविण्यात आले. यामुळे ६ वर्गाकरिता एकच शिक्षक गणित व विज्ञान हे विषय शिकवत असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यांचा शैक्षणिक दर्जा खालावत आहे. यामुळे सरपंच शिवकुमार रहांगडाले, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अरविंद येवलकर, मंजुबाई बोपचे व २७ गावकऱ्यांनी कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे. मात्र ही बदली नियमानुसार असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.