Lok Sabha Election 2019; ४१ अंश तापमानात ७० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 11:50 PM2019-04-11T23:50:26+5:302019-04-11T23:51:31+5:30

सूर्य आग ओकत असताना तब्बल ४१ अंश तापमानातही भंडारा-गोंदिया लोकसभा मतदानसंघात सरासरी ७० टक्के मतदान झाले. उन्हाची पर्वा न करता मतदार लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झाले. राष्ट्रवादीचे नाना पंचबुध्दे, भाजपाचे सुनील मेंढे यांच्यासह १४ उमेदवारांचे भाग्य मशीन बंद झाले.

Lok Sabha Election 2019; 70 percent voting in 41 degree temperature | Lok Sabha Election 2019; ४१ अंश तापमानात ७० टक्के मतदान

Lok Sabha Election 2019; ४१ अंश तापमानात ७० टक्के मतदान

Next
ठळक मुद्देलोकशाहीचा उत्सव : १४ उमेदवारांचे भाग्य मशीन बंद, ४२ दिवस करावी लागणार निकालाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सूर्य आग ओकत असताना तब्बल ४१ अंश तापमानातही भंडारा-गोंदिया लोकसभा मतदानसंघात सरासरी ७० टक्के मतदान झाले. उन्हाची पर्वा न करता मतदार लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झाले. राष्ट्रवादीचे नाना पंचबुध्दे, भाजपाचे सुनील मेंढे यांच्यासह १४ उमेदवारांचे भाग्य मशीन बंद झाले. सकाळी मतदान केंद्रावर रांगा लागल्याचे दिसत होते. तर दुपारी मतदान केंद्रावरील उन्हामुळे गर्दी ओसरली होती. सायंकाळी मात्र पुन्हा मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र दोन्ही जिल्ह्यातील मतदान केंद्रावर दिसत होती. सखी आणि आदर्श मतदान केंद्र लग्न सोहळ्यासारखे सजविण्यात आले होते.
भंडारा-गोंदिया मतदारसंघात गुरुवारी सकाळी ७ वाजतापासून मतदानाला प्रारंभ झाला. २१८४ मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पडले.नागरिकांमध्ये मतदानाचा प्रचंड उत्साह दिसून येत होता. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर सकाळीच मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसत होते. गोंदियाचे तापमान गुरुवारी ४१ अंश सेल्सिअस एवढे नोंदविल्या गेले.
सकाळी ८ वाजतापासूनच उन्हाचे चटके बसत होते. परंतु लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी मतदारानी उन्हाची पर्वा न करता मतदान केंद्र गाठले. सकाळी ९ वाजेपर्यंत ८.४५ टक्के, सकाळी ११ वाजेपर्यंत २१.८८ टक्के आणि दुपारी १ वाजेपर्यंत ३८.१९ टक्के मतदान झाले.
जनता आपल्यावर विश्वास दाखविणार - प्रफुल्ल पटेल
मागील पाच वर्षांत भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा विकास होण्याऐवजी अधोगतीच झाली. एकही उद्योग न आल्याने बेरोजगारीत वाढ आणि धानाच्या हमीभावात वाढ न झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. मागील पाच वर्षांत या दोन्ही जिल्ह्यात एकही विकास काम झाले नाही. त्यामुळे जनता भाजप सरकारला त्रस्त झाली असून या दोन्ही जिल्ह्यातील जनता विकासासाठी पुन्हा आपल्यावर विश्वास दाखवेल.
या निवडणुकीत आपण स्वत: उभे नसलो तरी जनता आपण दिलेल्या उमेदवारावर पूर्णपणे विश्वास दाखवेल.२०१४ सारखी या निवडणुकीत मोदी लाट नसून ते निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईलच असा विश्वास प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.
प्रफुल्ल पटेल यांनी केले कुटुंबीयांसह मतदान
खा.प्रफुल्ल पटेल यांनी गुरूवारी (दि.११) सकाळी ८ वाजता कुडवा मार्गावरील येथील नमाद महाविद्यालयातील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी कुटुंबीयांसह दाखल झाले. या वेळी त्यांच्यासह पत्नी वर्षा पटेल आणि तिन्ही मुली उपस्थित होत्या. यानंतर पटेल यांनी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजाविला.
नेत्यांनी केले मतदान
राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल व पत्नी वर्षा पटेल यांनी कुटुंबीयांसह गोंदिया येथे मतदान केले. खासदार मधुकर कुकडे यांनी तुमसर येथे मतदान केंद्रावर सहपरिवार जावून मतदानाचा हक्क बजावला.पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी सडक अर्जुनी येथे, आ.गोपालदास अग्रवाल यांनी गोंदिया येथे तर आ.विजय रहांगडाले यांनी तिरोडा येथे आणि आ.संजय पुराम यांनी पुराडा येथे तर विधानपरिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी भंडारा शहरात, व माजी आ.राजेंद्र जैन यांनी गोंदिया येथे सपत्नीक मतदान केले. राष्टष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुध्दे यांनी भंडारा शहरातील पंचशिल प्राथमिक शाळेत तर भाजपाचे उमेदवार सुनील मेंढे यांनी नुतन महाराष्ट्र विद्यालयात सपत्नीक मतदान केले.
वयोवृध्दांचे मतदान
जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रावर वृध्दही मतदानासाठी उत्साहाने आल्याचे दिसत होते.सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथे एका वृध्द महिलेला चक्क उचलून मतदान केंद्रावर आणण्यात आले.
नवमतदारांमध्ये उत्साह
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात यंदा ५३ हजार नवमतदारांची भर पडली. यात पहिल्यांदाच मतदान करणाºया युवकांची संख्या ही ३६ हजारावर होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये मतदानाप्रती उत्साह होता. या नवमतदारांनी आपल्या कुटुंबीयांसह मतदान केंद्रावर हजेरी लावून मतदानाचा हक्क बजाविला.तसेच लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होवून बहुमुल्य मताचे महत्त्व पटवून दिले.
सेल्फी विथ वोटरचे आकर्षण
लोकसभा निवडणुकी दरम्यान मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक विभागाने यंदा विविध उपक्रम राबविले. जिल्ह्यातील काही मतदान केंद्रावर सेल्फी विथ वोटरचे एक कट आऊट ठेवण्यात आले होते. यासमोर उभे राहून सेल्फी घेण्यासाठी मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली होती.त्यामुळे सेल्फी विथ वोटरच्या कट आऊटने मतदारांचे लक्ष वेधून घेतले होते.
अनेक मतदार मतदानापासून वंचित
निवडणूक विभागाने वितरीत केलेल्या वोटर स्लीप अनेक मतदारांना मिळाल्या नाही.तर अनेक मतदारांचे नाव मतदार यादीत नसल्याने त्यांना मतदान करण्यापासून वंचित राहावे लागले. तर अनेकांचे मतदार केंद्र बदलल्याचा फटका बसला.त्यामुळे मतदारांमध्ये निरुउत्साह निर्माण झाला होता.
गुप्त मतदान प्रक्रियेचा भंग
लोकशाही प्रक्रियेत मतदानाला फार महत्त्व आहे. त्यामुळे कोणत्या मतदाराने कुणाला मतदान केले हे कळू नये, यासाठी मतदान केंद्रावर विशिष्ट नियम निवडणूक विभागाने लागू केले आहेत. मात्र नवेगावबांध येथील एका मतदान केंद्रावर गुप्त मतदान प्रक्रियेचा पूर्णपणे फज्जा उडविल्याचे चित्र होते.

Web Title: Lok Sabha Election 2019; 70 percent voting in 41 degree temperature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.