Lok Sabha Election 2019; भाजप सेनेत समन्वयाचा अभाव, मात्र प्रचारात सक्रिय सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 10:07 PM2019-04-06T22:07:21+5:302019-04-06T22:08:01+5:30
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला आहे. तर भाजप-सेनेत युती झाल्याने भंडारा-गोंदिया मतदाससंघातील शिवसैनिकांनी ‘मातोश्री’वरुन आलेल्या युती धर्माच्या आदेशाचे पालन करीत भाजप उमेदवाराचा प्रचाराला सुरूवात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला आहे. तर भाजप-सेनेत युती झाल्याने भंडारा-गोंदिया मतदाससंघातील शिवसैनिकांनी ‘मातोश्री’वरुन आलेल्या युती धर्माच्या आदेशाचे पालन करीत भाजप उमेदवाराचा प्रचाराला सुरूवात केली आहे. मात्र मतदानाला केवळ पाच दिवस शिल्लक असताना अद्यापही दोन्ही पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये सर्व काही आॅलबेल आहे असे दिसून येत नाही. पण यामुळे शिवसैनिकांनी गप्प बसू न राहता युतीच्या उमेदवाराचा प्रचार सुरू केला आहे. सभा, रॅलीमध्ये सुध्दा त्यांचा सहभाग दिसून येत आहे.
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात शिवसेनेचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. सध्या या दोन्ही जिल्ह्यातील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयातूनच निवडणूक प्रचाराची धूरा सांभाळली जात आहे. गोंदिया जिल्ह्यात गोंदिया शहर वगळता इतर ठिकाणी अद्यापही शिवसेनेचे प्रचार कार्यालये उघडली नाही. मात्र शिवसैनिक भाजप उमेदवाराच्या प्रचार सभा आणि रॅलीमध्ये सहभागी होऊन प्रचार करीत आहे. प्रचार कार्यालये नसले तरी शिवसैनिक एकदिलाने मतदारांशीे संवाद साधत प्रचार करीत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. युती धर्माच्या आदेशाचे पालन करीत वरिष्ठ पातळीवर जरी नेत्यांचे मनोमिलन झाले असले तरी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलनाचा थोडाफार अभाव दिसून आला.
शिवसेनेला फारसे विचारत घेतले जात नसल्याने शिवसैनिकांमध्ये थोडीफार नाराजी सुध्दा आहे. पण या दोन्ही पक्षाच्या प्रचार कार्यालयातील वातावरण ‘निवडणुकी’ पुरते का होईना अनुकुल दाखविले जात आहे. तर शिवसैनिक सुध्दा यासर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून सहा महिन्यांने होणाऱ्या निवडणुकांकडे पाहत प्रचाराला भिडले आहेत.
विशेष म्हणजे वाढत्या उन्हाच्या झळा लक्षात घेऊन शिवसैनिक सकाळीच कार्यालयात पोहचून प्रचाराचे नियोजन करुन कार्यालयाबाहेर पडत असल्याचे चित्र पाहयला मिळाले. एकंदरीत अंतर्गत मनभेद असले तरी प्रचारावर त्याचा परिणाम होऊ नये याची काळजी घेत आहेत.
विधानसभा मतदारसंघातील मित्रपक्षाच्या कार्यालयांत काय दिसले?
१. गोंदिया : येथे शिवसेनेचे स्वतंत्र कार्यालय असून सकाळपासूनच शिवसैनिकांची वर्दळ सुरू होते. प्रचाराचे नियोजन करुन शिवसैनिक बाहेर पडत असल्याचे दिसले.
२.साकोली : शिवसेने स्वतंत्र कार्यालय उघडले नाही. मात्र भाजपच्या कार्यालयात शिवसैनिक सकाळी एकत्र येतात.भाजपच्या नियोजनानुसार प्रचारात सहकार्य करतात.
३. तिरोडा. : तिरोडा येथे शिवसेनेचे स्वतंत्र प्रचार कार्यालय नाही. मात्र येथील पदाधिकाऱ्यांच्या घरुनच प्रचाराची धुरा सांभाळली जात असून शिवसैनिक येथूनच प्रचारासाठी जातात.
४. तुमसर : येथे शिवसेना उपजिल्हा प्रमुखाच्या कार्यालयातून प्रचाराची सुत्रे हलतात, शिवसैनिक एकत्र येतात, भाजपशी समन्वय साधून नियोजन करताना दिसले.
५. अर्जुनी मोरगाव : येथे सुध्दा शिवसेनेचे स्वतंत्र प्रचार कार्यालय नसून शिवसैनिक भाजपच्या कार्यालयात शिवसैनिक सकाळी एकत्र येवून प्रचाराचे नियोजन करतात.
६. भंडारा : शिवसेना जिल्हा कार्यालयात शिवसैनिकांची सकाळपासून वर्दळ दिसते. जिल्हा प्रमुखांच्या निर्देशानुसार प्रचाराचे नियोजन होते.
मित्र पक्ष आमच्या सोबत
कोणताही किंतू परंतु मनात न ठेवता शिवसेना आणि आरपीआयचा आठवले गट आमच्यासोबत प्रचारात मेहनत घेत आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे यासाठी सर्व घटक पक्ष आपल्यासोबत आहे.
- सुनील मेंढे, उमेदवार, भाजप
युती धर्माचे पालन
युती धर्म पाळण्यासाठी आम्ही भाजपसोबत सुरूवातीपासूनच आहोत. प्रचाराचे स्वतंत्र नियोजन करुन जि.प.क्षेत्रनिहाय आम्ही दौरे करीत आहोत. नेत्यांच्या सभांना ही आम्ही उपस्थित राहत आहोत.
-मुकेश शिवहरे,जिल्हा प्रमुख, शिवसेना