Lok Sabha Election 2019; सन्मानच नाही तर युतीधर्म पाळायचा कसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 10:12 PM2019-03-31T22:12:57+5:302019-03-31T22:14:06+5:30
निवडणुकीच्या प्रचाराला साधे वाहन तर सोडा दुपट्टाही मिळाला नाही. कुणी सन्मानाने बोलवायला तयार नाही. अशा स्थितीत युतीधर्म पाळायचा कसा असा सवाल भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील शिवसैनिक आता थेट विचारत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : निवडणुकीच्या प्रचाराला साधे वाहन तर सोडा दुपट्टाही मिळाला नाही. कुणी सन्मानाने बोलवायला तयार नाही. अशा स्थितीत युतीधर्म पाळायचा कसा असा सवाल भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील शिवसैनिक आता थेट विचारत आहेत. भाजपाने आपली स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबविणे सुरु केले असून शिवसेनेच्या नेत्यासह शिवसैनिकांनाही अडगळीत टाकल्याचे चित्र सध्या मतदार संघात आहे.
राज्यात भाजपा-सेना युतीची घोषणा लोकसभा निवडणुकीपूर्वी झाली. तत्पूर्वी सेना आणि भाजप एकमेकांवर कुरघोडी करीत होते. भंडारा जिल्हा शिवसेनातर भाजपावर आक्रमकपणे तुटून पडत होती. स्थानिक प्रश्नांवर रस्त्यावर उतरुन आंदोलने केली. सत्ताधारी पक्षाचा घटक पक्ष असतांनाही सेनेने जनतेच्या प्रश्नांवर रान उठविले होते. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपा-सेना युती झाली. जिल्ह्यात सेना आणि भाजपा नेत्यांचे मनोमिलन झाले असले तरी शिवसैनिक मात्र त्याच जोशात आहेत.
आता लोकसभेची निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार सुनील मेंढे रिंगणात आहेत. भाजपाचा प्रचार गावागावांत जोमात सुरु आहे. मात्र या प्रचारात कुठेही शिवसैनिक दिसत नाहीत. नामांकन दाखल करण्याच्या दिवशी काढण्यात आलेल्या रॅलीत शिवसैनिक उपस्थित होते. मात्र त्यानंतर त्यांना कुणी सन्मानाने २बोलावल्याचे नसल्याचे शिवसैनिक खाजगीत बोलत आहेत. कुणी आम्हाला सन्मानाने प्रचाराला या, असे सांगत नाही. वाहनही दिले नाही. तर एवढेच काय साधा दुपट्टाही आम्हाला मिळाला नसल्याचे शिवसैनिक सांगत आहेत. त्यामुळे शिवसैनिक सध्यातरी आपल्या घरीच असल्याचे चित्र दिसून येते.
नाराजीचा उद्रेक झाला तर...
भाजपा-शिवसेनेची वरिष्ठ पातळीवर युती झाली. शिवसैनिक भाजपाच्या प्रचारासाठी तयारीत आहेत. परंतु सन्मानाने बोलावित नसल्याने कुणी जायला तयार नाही, अशीच वागणुक शिवसैनिकांना मिळाली तर त्याचा उद्रेक होऊ शकतो. त्यानंतर कोणताच नेता या शिवसैनिकाचा उद्रेकाला शांत करु शकरणार नाही.
शिवसेनेची गावागावांत बांधणी
भंडारा व गोंदिया जिल्ह्यात शिवसेनेची गावागावांत बांधणी आहे. शेकडो शिवसैनिक आहेत. भंडाराचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र भोंडेकर अनुभवी आहेत. त्यांनी भंडाराचे आमदार म्हणून नेतृत्व केले आहेत. शिवसेनेची सध्या चांगली पकड मतदार संघात असताना त्यांना नेमके बाजुला का सारले जात आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिवसेना - भाजपात समन्वयाचा अभाव
लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसत आहे. त्यामुळे प्रचारात भाजपा-सेनेचे ‘एकला चलो रे’ अशी भुमिका दिसत आहे. याऊलट काँग्रेस आणि राष्टÑवादीत चांगला समन्वय आहे. दोन्ही पक्षाचे नेते एकदिलाने प्रचाराचा कामाला लागले आहेत.