Lok Sabha Election 2019; अधिकारी सावलीत अन् मतदार उन्हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 11:57 PM2019-04-11T23:57:35+5:302019-04-11T23:59:45+5:30
निवडणूक विभाग आणि जिल्हा प्रशासनाने लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृतीवर विशेष भर दिला. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : निवडणूक विभाग आणि जिल्हा प्रशासनाने लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृतीवर विशेष भर दिला. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला.तर वाढते तापमान लक्षात घेऊन मतदान केंद्र परिसरात मतदारांना उभे राहण्यासाठी मंडप टाकण्याच्या सूचना दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात गुरूवारी (दि.११) अनेक मतदान केंद्रावर मंडापासह, पिण्याच्या पाण्याच्या सुविधेचा सुध्दा अभाव होता. त्यामुळे मतदारांना मतदान करण्यासाठी उन्हातच उभे राहावे लागले. त्यामुळे मतदान केंद्रावर सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रशासनाचा दावा पूर्णपणे फोल ठरला.
मतदान केंद्रावर मतदारांना अनुकुल वातावरण निर्माण करुन देण्यासाठी तसेच महिलांसाठी सखी मतदान केंद्राचा उपक्रम निवडणूक विभागातर्फे यंदा प्रथमच राबविण्यात आला. तर दिव्यांग आणि वृध्दांना मतदान केंद्रावर व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले होते. मात्र नक्षलग्रस्त भागातील अनेक मतदान केंद्रावर व्हिलचेअरची सुविधाच नव्हती.त्यामुळे घोनाडी येथील मतदान केंद्रावर दोन महिलांनीच आपल्या अंपग मुलीला मतदान केंद्रावर मतदान केंद्रावर उचलून आणावे लागले. हवामान विभागाने पुढील दोन तिन दिवस तापमान अधिक राहण्याची शक्यता वर्तविली होती. त्यामुळे निवडणूक प्रशासनाने सुध्दा याचा मतदानावर परिणाम होवू नये, यासाठी मतदान केंद्राबाहेर मंडप टाकण्याच्या सूचना केल्याचे सांगितले होते.मात्र जिल्ह्यातील बहुतेक मतदान केंद्रावर मंडप नसल्याने मतदारांना भर उन्हात मतदान करण्यासाठी उभे राहावे लागले. तर मतदान केंद्र स्थळी पाण्याची देखील सुविधा नव्हती त्याचा सुध्दा अनेक मतदारांना फटका बसला. तर मतदान केंद्रस्थळी नियुक्त निवडणूक अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सुध्दा पाण्याची सोय नसल्याने त्यांनी स्वत:च पैसे गोळा करुन पाण्याची कॅन मागविल्याचे सांगितले. एकंदरीत मतदान केंद्रावर विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रशासनाचा दावा पूर्णपणे फोल ठरला.
मतदान केंद्राची पाहणी न करताच निवड
गुरूवारी (दि.११) मतदानाकरिता निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक कर्मचाºयांच्या पोलींग पाटर्या बुधवारी (दि.१०) त्यांच्या नियुक्त ठिकाणी साहित्य घेवून पोहचले.मात्र मतदानासाठी निवड केलेल्या बहुतेक मतदान केंद्रावर वीज आणि पाण्याच्या समस्येला कर्मचाºयांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे मतदानापूर्वीच ही स्थिती आहे, तर मतदाना दरम्यान काही गडबड झाल्यास जबाबदार कोण राहणार असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी याची निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे याची तक्रार सुध्दा केली. त्यामुळे निवडणूक विभागाने मतदान केंद्राची निवड करताना त्यांची पाहणी केली किंवा नाही असा प्रश्न निर्माण झाला होता.