Lok Sabha Election 2019; सोशल मीडियावर प्रचारयुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 10:15 PM2019-04-01T22:15:13+5:302019-04-01T22:16:25+5:30

लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे कोणत्याही उमदेवाराला शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक उमेदवार सोशल मीडियाचा आधार घेत आहे. सोशल मीडियावरुन पोस्ट टाकून आपल्या ‘कार्यकर्तृत्वा’ची महती मतदारापर्यंत पोहोचविण्याची धडपड सुरू आहे. सध्या व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक उघडले की निवडणुकांच्याच पोस्टचा सामना करावा लागत आहे.

Lok Sabha Election 2019; Publicity on social media | Lok Sabha Election 2019; सोशल मीडियावर प्रचारयुद्ध

Lok Sabha Election 2019; सोशल मीडियावर प्रचारयुद्ध

Next
ठळक मुद्देभंडारा-गोंदिया लोकसभा : फेसबुक आणि टिष्ट्वटरवरही पोस्टचा पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे कोणत्याही उमदेवाराला शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक उमेदवार सोशल मीडियाचा आधार घेत आहे. सोशल मीडियावरुन पोस्ट टाकून आपल्या ‘कार्यकर्तृत्वा’ची महती मतदारापर्यंत पोहोचविण्याची धडपड सुरू आहे. सध्या व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक उघडले की निवडणुकांच्याच पोस्टचा सामना करावा लागत आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुक अवघ्या आठवडाभरावर आली आहे. दोन जिल्ह्याचे क्षेत्र विस्ताराने मोठे आहे. सहा विधानसभा क्षेत्रात तब्बल १६०० गावे आहेत. रात्रंदिवस एक केला तरी उमेदवाराला प्रत्येक गावात जाणे शक्य नाही. मात्र निवडणूक तर जिंकायची आहे. मतदारांपर्यंत पोहचायचे असल्याने वेगवेगळ्या प्रचार माध्यमांचा वापर केला जात आहे. अलीकडे प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आला आहे. या स्मार्ट फोनचा उपयोग प्रचारात मोठ्या खुबीने केला जात आहे.
व्हॉटस्अ‍ॅप वरील ग्रुपच्या माध्यमातून उमेदवार आपले म्हणने जनतेपर्यंत पोहचवत आहे. प्रचारसभा, नेत्यांची भाषणे आणि विविध आश्वासनाचा पाऊस सध्या व्हॉटस्अ‍ॅपवर पडत आहेत. व्हॉटस्अ‍ॅप उघडले की धडाधड शेकडो मॅसेज येवून पडत आहेत. पक्षीय उमेदवारासोबतच अपक्ष उमेदवारही यात आघाडीवर आहेत.
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात सध्या सोशल मीडियावरुन प्रचाराचा धुमाकूळ सुरु आहे. गावागावांत प्रचाराची रणधुमाळी अद्याप शिगेला पोहचली नाही. मात्र सोशल मीडियावर खडाजंगी सुरु आहे. निवडणूक आयोगाची सोशल मीडियावर करडी नजर आहे. सायबर सेलही त्यावर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर जपुन करणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय विषयांवर शेरेबाजी
राष्ट्रीय स्तरावर गाजणाऱ्या मुद्यांवर जोरदार शेरेबाजी सध्या सुरु आहे. टिकाटिपणीतून पक्षाची, उमेदवाराची इमेज तयार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. अनेक ग्रुपवर आता कार्यकर्त्यांत जुंपल्याचे दिसून येत आहे.
नो पॉलिटिक्स प्लीज, पण लक्ष देतो कोण?
स्मार्टफोनधारक व्हॉटस्अ‍ॅपच्या अनेक ग्रुपचे सदस्य आहेत. काही ग्रुप अ‍ॅडमिन आपला ग्रुप राजकारणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. सामाजिक विषयांवरुन तयार झालेल्या ग्रुपच्या अ‍ॅडमिनची सध्या चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. नो पॉलिटिक्स प्लीज, असे वारंवार संदेश टाकूनही याकडे कुणी लक्ष देत नाही. कारण सर्वत्र ज्वर चढला आहे तो राजकारणाचा. वारंवार सुचना देवूनही दररोज पोस्ट टाकणारे कुणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत सध्यातरी दिसत नाही. राजकीय वातावरण तापत असतांना सोशल मीडियावर हा प्रकार वाढतच जाणार.
कार्यकर्त्यांत जुंपली
निवडणुकीची खरी रंगत सोशल मीडियावर बघायला मिळत आहे. पक्ष आणि उमेदवारांवर सडकून टिका सुरु आहे. परस्पर विरोधी पक्षाचे कार्यकर्त्यांत सोशल मीडियावर चांगलीच जुंपल्याची दिसून येत आहे. आपलाच पक्ष कसा चांगला, आपला नेता कसा श्रेष्ठ हे सिध्द करण्याचा आटापिटा सुरु आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019; Publicity on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.