Lok Sabha Election 2019; गोंदिया जिल्ह्यात मतांच्या पिकासाठी आश्वासनांची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 10:19 PM2019-04-05T22:19:54+5:302019-04-05T22:22:20+5:30

एप्रिल महिन्यातील तापमान जस जसे वाढत आहे तस तसे निवडणुकीचे वातावरणही तापत आहे. लोकसभेची ही निवडणूक विधानसभेची सेमीफायनल असल्याने या निवडणुकीची खासदारांपेक्षा अधिक चिंता विद्यमान आमदार आणि भावी उमेदवारांना आहे.

Lok Sabha Election 2019; Sowing assurances for votes for Gondia district | Lok Sabha Election 2019; गोंदिया जिल्ह्यात मतांच्या पिकासाठी आश्वासनांची पेरणी

Lok Sabha Election 2019; गोंदिया जिल्ह्यात मतांच्या पिकासाठी आश्वासनांची पेरणी

googlenewsNext
ठळक मुद्देआमदारांची प्रतिष्ठा पणालामतांचा जोगवा मागत नेते गावात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : एप्रिल महिन्यातील तापमान जस जसे वाढत आहे तस तसे निवडणुकीचे वातावरणही तापत आहे. लोकसभेची ही निवडणूक विधानसभेची सेमीफायनल असल्याने या निवडणुकीची खासदारांपेक्षा अधिक चिंता विद्यमान आमदार आणि भावी उमेदवारांना आहे. त्यामुळेच मागीेल आठ दिवसांपासून आमदारांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरूवात केली. मतदारांना आश्वासने देत आणि प्रतिष्ठा पणाला लागली असल्याचे सांगत मतांचा जोगवा मागत असल्याचे चित्र आहे. एकंदरीत मतांचे भरघोस पीक घेण्यासाठी आश्वासनांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जात आहे.
भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहे. सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघावर भाजपचे तर गोंदिया मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. तर सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार असताना सुध्दा भाजप उमेदवाराचा पराभव झाला होता.पण, सहा महिन्यानंतर पुन्हा लोकसभेच्या निवडणुका होवू घातल्या असल्याने कुणी याला फारसे गांभिर्याने घेतले नव्हते. मात्र आता ही निवडणूक भाजप व राष्टÑवादी काँग्रेसने प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाचे आमदार व नेते युध्द पातळीवर कामाला लागले आहेत.
मतदानासाठी सहा दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहचण्यासाठी आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धडपड सुरू आहे. ही निवडणूक जरी खासदाराची असली तरी याच निवडणुकीच्या निकालावरुन सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे तिकिट निश्चित होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीचे जेवढे टेन्शन लोकसभा निवडणुकीला उभे असलेल्या उमेदवाराला नसेल त्याच्या किती तरी पट टेन्शन आमदारांना आणि विधानसभा निवडणुकीसाठी बाशींग बांधून असलेल्यांना आहे. त्यामुळेचे हे सर्व दिवसरात्र एक करुन मतदारसंघ पिजून काढीत गावातील आपल्या कार्यकर्त्यांना भाऊ काहीही झाले तरी लीड मिळायला पाहिजे असे आर्वजून सांगत आहेत.
तर लोकसभा पोटनिवडणुकीत अर्जुनी मोरगाव मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला लीड मिळाली होती. त्यामुळे या वेळेस हेच चित्र राहू नये यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे.अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार संघातून आ.राजकुमार बडोले हे निवडून आले होते. शिवाय पक्षाने त्यांना कॅबिनेट मंत्री सुध्दा बनविले आहे. पोटनिवडणुकीत त्यांच्या मतदारसंघात पडलेला खड्डा पक्ष श्रेष्ठी अद्यापही विसरलेले नाही. त्यामुळे या निवडणुकीत पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाल्यास विधानसभेचे तिकीट मिळण्यापासून वंचित दूर राहावे लागू शकते. त्यामुळे ही वेळ पुन्हा येवू नये यासाठी बडोले हे सुध्दा मतदारसंघात दिवसरात्र एक करुन प्रचार करीत आहे.
भाजप उमेदवारासह आपली सुध्दा प्रतिष्ठा पणाला लागली असल्याचे सांगत मतदारांकडून मतांचा जोगवा मागत असल्याचे चित्र आहे. जवळपास हीच परिस्थिती सर्वच मतदारसंघात आहे. मतदारांना पुन्हा आश्वासने देत मंताचे पीक घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

प्रचाराला रंग चढेना
लोकसभा निवडणुकीसाठी येत्या ११ एप्रिलला मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी केवळ सहा दिवसांचा कालावधी शिल्लक असतांना सुध्दा मतदारसंघात प्रचाराला रंग चढला नसल्याचे चित्र आहे. अर्जुनी मोरगाव मतदारसंघात अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस वगळता इतर पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या सभा झालेल्या नाही. तर उमेदवार सुध्दा नवखे असल्याने कार्यकर्ते सुध्दा संभ्रमात असल्याचे चित्र आहे.

पक्ष प्रचार कार्यालयात शुकशुकाट
मतदानासाठी केवळ सहा दिवस शिल्लक राहिले असले तरी अद्यापही प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रचार कार्यालयांमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांची फारशी वर्दळ वाढलेली नाही.निवडणुकीच्या धामधुमीत सुध्दा प्रचार कार्यालयातील शुकशुकाट बरेच काही सांगून जात आहे.

बंडखोरांने वाढविला बीपी
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी सुनील मेंढे यांना उमेदवारी दिली. मात्र पक्षाने आपल्याला उमेदवारी नाकारल्याचे सांगत भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र पटले यांनी पक्षाशी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच प्रचाराला सुध्दा सुरूवात केली आहे. या निवडणुकीत भाजपने पोवार उमेदवार न दिल्याने या समाजात थोडीफार नाराजी आहे. ही नाराजी कॅश करण्याचा प्रयत्न राजेंद्र पटले यांनी चालविला आहे. त्यामुळे भाजपचा बीपी वाढला असल्याचे बोलल्या जाते.

Web Title: Lok Sabha Election 2019; Sowing assurances for votes for Gondia district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.