Lok Sabha Election 2019; चेहऱ्यांमागील खरे मुखवटे व हिरो वेगळेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 10:02 PM2019-04-07T22:02:48+5:302019-04-07T22:04:00+5:30
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातून यंदा प्रथमच युतीने नवखा तर महाआघाडीने ज्येष्ठ उमेदवार दिला आहे. मतदारांसाठी उमेदवारांचे चेहरे नवीन असले तर या चेहऱ्यांमागील खरे मुखवटे आणि हिरो वेगळेच आहेत. ही निवडणूक सुध्दा या मुखवट्यांभोवती फिरत आहे. रिंगणात जरी उमेदवार असले तरी या मागे असलेल्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातून यंदा प्रथमच युतीने नवखा तर महाआघाडीने ज्येष्ठ उमेदवार दिला आहे. मतदारांसाठी उमेदवारांचे चेहरे नवीन असले तर या चेहऱ्यांमागील खरे मुखवटे आणि हिरो वेगळेच आहेत. ही निवडणूक सुध्दा या मुखवट्यांभोवती फिरत आहे. रिंगणात जरी उमेदवार असले तरी या मागे असलेल्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
निवडणूक म्हटले की पहिल्या दिवसांपासून त्याचे योग्य व्यवस्थापन करावे लागते. निवडणुकी दरम्यान मिळलेल्या कमी दिवसांचे योग्य व्यवस्थापन करण्यात जो बाजी मारतो तो खºया अर्थाने सिंकदर ठरतो. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुध्दा यंदा उमेदवारांपेक्षा त्यामागे असलेल्या दिग्गजांभोवती केंद्रीत आहे. यंदा निवडणुकीच्या रिंगणात खा. प्रफुल्ल पटेल नसेल तरी प्रत्यक्षात ही निवडणूक तेच लढवित असल्याचे चित्र आहे. महाआघाडीच्या उमेदवारच्या प्रचारार्थ ते स्वत: आणि वर्षा पटेल हे दिवसरात्र एक करुन संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढीत आहेत. त्यांच्या सोबतीला खा. मधुकर कुकडे, माजी आ.राजेंद्र जैन, आ.गोपालदास अग्रवाल आणि दोन्ही पक्षाचे जिल्हाध्यक्ष व प्रमुख नेते हे सुध्दा मतदारसंघातील प्रत्येक गावापर्यंत पोहचून प्रचार करीत आहे. मतदारसंघातील चित्रावरुन प्रफुल्ल पटेल हे स्वत: जरी उमेदवार नसले तरी त्यांनी ही निवडणूक स्वत:च रिंगणात असल्यासारखी मनावर घेतली आहे. त्यामुळेच ते उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. तर युतीचे सुध्दा यंदा हे तंत्र आहे. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. डॉ. परिणय फुके, पालकमंत्री राजकुमार बडोले, आ. अनिल सोले व भाजपचे विदर्भ संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर यांच्या हाती निवडणूक व्यवस्थापनाची सूत्रे आहेत.
शिवाय युतीचा उमेदवार यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरविला असून त्यांनी या मतदारसंघाची निवडणूक फार मनावर घेतली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांचे विश्वासू समजले जाणारे फुके हे मागील पंधरा दिवसांपासून या मतदारसंघात तळ ठोकून आहे. निवडणूक व्यवस्थापनाची सर्व सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली आहे. तर बावनकुळे, बडोले, सोले आणि कोठेकर या दिग्गजांच्या अनुभवाने ते मतदारसंघात चक्रव्यूह रचत आहेत. युतीतर्फे सुनील मेंढे हे निवडणूक लढवित असले तरी प्रत्यक्षात परिणय फुके हेच मैदानात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
त्यामुळेच उमेदवारांच्या चेहऱ्यांमागील मुखवटे वेगळेच असून या दिग्गजांची खºया अर्थाने प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर या मतदार संघातील हेवी वेट निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्टÑाचे लक्ष लागले आहे.