‘लोकमत रक्ताचं नातं’ रक्तदान मोहीम २ जुलैपासून होणार सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 05:00 AM2021-06-26T05:00:00+5:302021-06-26T05:00:21+5:30
लोकमत वृत्तपत्र समुहाच्यावतीने लोकमत रक्ताचं नातं हा उपक्रम जिल्हाभरात राबविला जाणार आहे. सध्या कोरोनाचा काळ आहे. या बिकट स्थितीत रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासत आहे. अशा कठीण समयी ‘लोकमत’ने हाती घेतलेला ‘लोकमत रक्ताचं नातं‘ हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे. आपण केलेल्या रक्तदानामुळे कुणाचा तरी जीव वाचविणे निश्चितच शक्य होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलैपासून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदान मोहिमेला प्रारंभ होत आहे. या कालावधीत संपूर्ण राज्यभरात रक्तदानाचा महायज्ञ होत आहे. कोरोनाकाळात रक्तदान शिबिरावरही परिणाम झाला. त्यामुळे रक्तदानाची कमतरता जाणवायला लागली. आता ती कमतरता भरून काढण्यासाठी ही रक्तदान मोहीम आयोजित करण्यात आली आहे.
‘लोकमत’च्या या उपक्रमात सर्वांनी हेच महान कार्य ही भूमिका घेऊन रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले. रक्त हे कोणत्याही कृत्रिम पदार्थापासून तयार करता येत नाही. त्यामुळे रक्तसंकलनाशिवाय पर्याय नाही. गोंदिया शहरासह तालुक्यातही रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
या रक्तदान शिबिराला विविध सामाजिक आणि राजकीय सहकार्य करण्याकरिता युवा वर्ग तसेच सखी मंच सदस्य व वाचक वर्ग यांनी पुढे येऊन महान रक्तदान शिबिराला यशस्वी करण्याचे आवाहन लोकमत गोंदिया जिल्हा कार्यालय प्रमुख मिलिंद वाढई, लोकमत जिल्हा प्रतिनिधी अंकुश गुंडावार, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी मुकेश शर्मा यांनी केले आहे. रक्तदान शिबिराच्या अधिक माहितीसाठी लोकमत इव्हेंटचे श्रीकांत पिल्लेवार (९८२३१८२३६७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.
लोकमत वृत्तपत्र समुहाच्यावतीने लोकमत रक्ताचं नातं हा उपक्रम जिल्हाभरात राबविला जाणार आहे. सध्या कोरोनाचा काळ आहे. या बिकट स्थितीत रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासत आहे. अशा कठीण समयी ‘लोकमत’ने हाती घेतलेला ‘लोकमत रक्ताचं नातं‘ हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे. आपण केलेल्या रक्तदानामुळे कुणाचा तरी जीव वाचविणे निश्चितच शक्य होणार आहे.
- नवाब मलिक, अल्पसंख्याक मंत्री तथा पालकमंत्री गोंदिया जिल्हा
सध्या महाराष्ट्राला रक्ताची गरज आहे. तसेच जिल्ह्यातही दररोज ३० बाॅटल रक्ताची गरज कुणाला तरी वाचविण्यासाठी भासत आहे. रक्ताची मागणी वाढत आहे. मात्र रक्ताचा अपेक्षित पुरवठा होण्यास अडचण होत आहे. रक्तदानातूनच ही गरज पूर्ण करता येणे शक्य आहे. ‘लोकमत’ने हाती घेतलेला ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अमूल्य अश्या उपक्रमात जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, ही काळाची गरज आहे. यासाठी सर्वांनी पुढे येत महान दान रक्तदान करण्याची गरज आहे.
- राजेश खवले,
जिल्हाधिकारी गोंदिया