दूध संकलन केंद्राद्वारे उत्पादकांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:37 AM2017-11-24T00:37:12+5:302017-11-24T00:39:11+5:30
तिरोडा तालुक्यात ठिकठिकाणी एका नामाकिंत कंपनीने दूध संकलन खरेदी केंद्र सुरू केले आले आहे. याचप्रकारे अर्जुनी गावात सुध्दा या दूध कंपनीचे दूध संकलन केंद्र सुरु आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदोरा बु. : तिरोडा तालुक्यात ठिकठिकाणी एका नामाकिंत कंपनीने दूध संकलन खरेदी केंद्र सुरू केले आले आहे. याचप्रकारे अर्जुनी गावात सुध्दा या दूध कंपनीचे दूध संकलन केंद्र सुरु आहे. या केंद्रात दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांची लूट होत असल्याची तक्रार काही शेतकºयांनी केली आहे.
या दूध संकलन केंद्रात अर्जुनी येथील दूध उत्पादक शेतकरी दूध देतात. परंतु या केंद्राद्वारे शेतकऱ्यांना दुधाची फॅट (डिग्री) कमी असल्याचे सांगून दुधाच्या प्रतिलिटर दरामागे ३ ते ४ रुपये प्रती लिटर मागे कमी दिले जात असल्याचा आरोप दूध उत्पादक शेतकºयांनी केला आहे. संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी या संपूर्ण प्रकाची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अर्जुनी येथील या कंपनीच्या दूध संकलन केंद्रावर आधी प्रति लिटर दुधाचा दर ३६ रुपये दिला जात होता. मात्र तो दर आता दोन रुपयांनी कमी करण्यात आला आहे. यावर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना दूध उत्पादन हा शेतीपूरक व्यवसाय आहे. पण दुग्ध व्यवसायावर सुध्दा उतरती कळा आल्याचे चित्र आहे. चाऱ्याचे दर गगणाला भिडले असून दुधाचे दर कमी झाल्याने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. यंदा पावसाअभावी जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. मात्र चाऱ्याचे दर दिवसेंदिवस वाढत असून त्या तुलनेत दुधाला दर मिळत नसल्याने शेतकºयांना अर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यातच दुग्ध संकलन केंद्राच्या कर्मचाºयांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
दुधाचे फॅट ६.०० ते ६.०५ बीएम आल्यास प्रतिलिटर ३३ रुपये दिले जात होते. परंतु मागील पंधरवाड्यापासून शेतकºयांचे तेच दूध त्यांची मशीन ६.०० च्या ऐवजी ४.०० ते ५.०० फॅट अशी दाखवते. याचा अर्थ असा की गुणवत्तामापक इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये कुठेतरी गौडबंगाल असल्याचा शेतकºयांचा आरोप आहे. यात शेतकऱ्यांचा दूधाचा दर २५ रुपये ते २६ रुपये असा दिला जातो. तोच दुधाची फॅट ६.०० वर येत होते. आता प्रत्येक दुधाची फॅट ४.०० ते ५.०० वर येत आहे. त्यामुळे या मागील कारणाचा शोध घेण्याचा गरज आहे. कंपनीच्या अर्जुनी येथील दुध संकलन केंद्राच्या गुणवत्तामापक इलेक्ट्रानिक मशीनची चौकशी करुन शेतकºयांचा संशय दूर करुन शेतकºयांना त्यांच्या दुधाचा दर पूर्वीप्रमाणे ३६ रुपये देण्यात यावा. अशी मागणी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
सदर कंपनीचे अर्जुनी, सावरा पिपरिया, किंडगीपार, बोदा, खातीटोला व मध्यप्रदेशात दूध संकलन केंद्र आहेत. या सर्व केंद्रावरील दूध बोंडराणी येथील शितगृहामध्ये जमा करुन टँकरद्वारे पाठविले जात असल्याची माहिती आहे.