महावितरणकडून लूट : शेतकऱ्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:19 AM2021-07-08T04:19:39+5:302021-07-08T04:19:39+5:30
अर्जुनी मोरगाव : विद्युत मीटर बंद असतानाही नवीन मीटर न बसवता मनमर्जी बिल आकारून महावितरण कंपनीने लुबाडणूक केल्याचा आरोप ...
अर्जुनी मोरगाव : विद्युत मीटर बंद असतानाही नवीन मीटर न बसवता मनमर्जी बिल आकारून महावितरण कंपनीने लुबाडणूक केल्याचा आरोप ताडगाव येथील शेतकरी विनायक केवळराम नाकाडे यांनी केला आहे.
तक्रारकर्ते नाकाडे यांची अर्जुनी मोरगाव शिवारात शेती आहे. ते धान पीक घेतात. त्यांच्याकडे पावणेतीन एकर शेती आहे. त्यांचे शेतात ६१४११०६२७८ क्रमांकाचे विद्युत मीटर बसविण्यात आले आहे. मार्च २०१२ ते मार्च २०१५ या कालावधीत कोणत्याही तिमाहीत विजेचा वापर ३९ युनिटपेक्षा अधिक नव्हता. मीटर बंद होते की काय कुणास ठाऊक? मात्र जून २०१५ ते २०१९ या कालावधीत चढत्या ११५५ पासून तर प्रति तिमाही ४०४४ युनिट पर्यंतचे बिल देऊन वसुली करण्यात आली. शेती तीच आणि पिकाचा प्रकारही तोच असताना वीज वापरात एवढी तफावत कशी हा एक संशोधनाचा विषय आहे. शेतकरी नाकाडे यांनी २४ जानेवारी २०२० रोजी नवीन वीज मीटरसाठी पैसे भरले. तब्बल ११ महिन्यानंतर २४ डिसें २०२० रोजी नवीन मीटर बसविण्यात आले. वर्षभरातील दोन हंगाम मिळून सहा महिने धान शेतीला विजेचा वापर होतो. मात्र २०१९ या वर्षात नाकाडे यांना चार तिमाहीचे ४०४४, ४०४४, ४०४४ व ९०० युनिट विजेचा वापर झाल्याचे बिल देण्यात आले. विशेष उल्लेखनीय म्हणजे सप्टेंबर २०२० ते मार्च २०२१ या सहा महिन्याचा १८०७ युनिट वापराचा बिल देण्यात आला. यात डिसेंबरपासून नवीन मीटरचे वाचन होते. प्रत्यक्षात सरासरी सहा महिन्यात १८०७ युनिटचा वापर होत असेल तर ४०४४ युनिटचे बिल देणे संयुक्तिक नाही. पैसे भरणा केल्यानंतर मीटर वेळेवर बसविला असता तर सरासरी मीटर वाचनानुसार पैसे भरण्याचा प्रसंग ओढवलाच नसता. या कालावधीत पीक नसतांनाही नाहक बिलाचा भरणा करावा लागला. यापद्धतीने महावितरण कंपनीच्या अर्जुनी मोरगाव उपविभागीय कार्यालयाने लुबाडणूक केल्याचा गंभीर आरोप नाकाडे यांनी केला आहे. २०१५ पासून अतिरिक्त भरलेल्या वाचनाची भरपाई महावितरण मंडळाने देण्याची मागणी त्यांनी केली आहे.