देवरी येथे मुद्रांक विक्रेत्याकडून सामान्यांची लूट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 03:43 PM2024-09-14T15:43:18+5:302024-09-14T15:44:26+5:30
Gondia : एकाधिकारशाहीमुळे विद्यार्थी व नागरिक त्रस्त अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : येथील तहसील कार्यालय बाहेर मुद्रांक विक्री करणारे मुद्रांक विक्रेत्याच्या एकाधिकारशाहीमुळे नागरिक व विद्यार्थी त्रस्त झाले आहे. मुद्रांक घेण्याकरिता १०, २०, ५० ते १०० रुपये अतिरिक्त द्यावे लागत असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याकडे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप आहे.
विद्यार्थ्यांपासून सर्वच घटकातील सामान्य माणसाचा मुद्रांकाशी (स्टॅम्प पेपर) संबंध येतो. विविध प्रमाणासाठी, डोमेसाइल सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व, जातीचा दाखला, सौदा पावती, करारनामा, प्रतिज्ञापत्र, खरेदी खत, वाटणी पत्र, तसेच कर्ज घेण्याकरिता स्टॅम्प पेपरचा उपयोग होतो. मात्र मूळ किमतीपेक्षा अधिक दराने मुद्रांकांची विक्री करून सामान्यांची अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी देवरी येथे वाढल्या आहेत. शुक्रवारी (दि.१३) लोकमत प्रतिनिधीने तहसील कार्यालयास भेट देऊन मुद्रांक विक्रेत्याची पोलखोल केली. येथील एकमात्र मुद्रांक विक्रेता हिरालाल बोरकर यांचेकडे लोकमत प्रतिनिधीने आपल्या सहकाऱ्याला अडीच हजार रुपयांचे स्टॅम्प पेपर घ्यायला पाठविले असता मुद्रांक विक्रेत्याने १७० रुपये अधिकचे मागितले. याबाबत त्याला विचारणा केली असता व १७० रुपयांचे पक्के बिल मागितले असता त्याने देण्यास स्पष्ट नकार दिला. आम्हाला परवडत नसल्याने आम्ही दहा-वीस रुपये अतिरिक्त घेत असल्याचे त्याचे म्हणणे होते.
कमिशन मिळते तरी अतिरिक्त पैसे
एकीकडे शासन मुद्रांक विक्रेत्यांना कोषागार मधून मुद्रांक खरेदी दरम्यान तीन टक्के कमिशन देत असते तरी सुद्धा मुद्रांक विक्रेता शंभर रुपयांच्या स्टॅम्प मागे दहा ते वीस रुपये तर ५०० च्या मागे पन्नास रुपये व हजारच्या स्टॅम्प मागे शंभर रुपये अधिकचे मागून नागरिकांची सर्रास लूट करीत आहेत. याबाबत दुय्यम निबंधकांना तक्रार केली असता त्यांनी त्याला एकदा माफ करा, असे सांगितले.
मुद्रांक विक्रेत्याजवळ दरपत्रक लावण्याची मागणी
मुद्रांक विक्रेत्याकडून नागरिकांची व विद्यार्थ्यांची होत असलेली आर्थिक लूट लक्षात घेता मुद्रांक विक्रेत्याला मुद्रांक खरेदीदाराने किती रुपयाच्या स्टॅम्पसाठी किती रुपये द्यावे व कोणत्या कामासाठी किती रुपयाचे मुद्रांक लागेल. नागरिकांनी अधिकचे पैसे न दिल्यास अडवणूक करणाऱ्या मुद्रांक विक्रेत्याची तक्रार करण्यासंबंधीच्या सूचनांचे फलक लावण्यात यावे.
प्रतिज्ञापत्रासाठी मुद्रांकांची गरज नाही
प्रतिज्ञा पत्रासाठी सरकारी कार्यालयात व न्यायालयात शेभर रुपये मुद्रांक शुल्काची आवश्यकता नाही. असे आदेश महाराष्ट्र वन व महसूल विभागाने एक जुलै २००४ अन्वये दिले आहेत. तरीही सरकारी कार्याल- यांमध्ये प्रतिज्ञापत्रासाठी शंभर रुपयांचा मुद्रांक दस्तावेजांसाठी वापरत असल्याचे आढळून आले आहे.
"देवरी येथे एकमात्र मुद्रांक विक्रेते हिरालाल बोरकर आहेत. कोषागार कार्यालयाकडून या विक्रेत्याला मागणीप्रमाणे सरकारी चालान भरून रक्कम अदा केल्यानंतर मुद्रांक दिले जातात. प्रत्येक मुद्रांक मागे मुद्रांक विक्रेत्याला तीन टक्के कमिशन दिले जातात."
- ओमप्रकाश उईके, उपकोषागार अधिकारी, देवरी
"मुद्रांक विक्रेत्याने मुद्रांक किमतीच्या व्यतिरिक्त एकही रुपया अतिरिक्त न घेणे बंधनकारक आहे. तरी सुद्धा मुद्रांक विक्रेता जास्तीची रक्कम घेत असेल तर त्याला एकदाच माफ करा. यापुढे त्यांना ताकीद दिली जाईल."
- दादाराव गाडे, दुय्यम निबंधक देवरी