मिनरल वॉटरपेक्षा तुमसरचे पाणी शुद्ध
By admin | Published: August 10, 2016 12:13 AM2016-08-10T00:13:50+5:302016-08-10T00:13:50+5:30
कोष्टी तसेच माडगी घाटावरून तुमसर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. पुरवठा होणारे पाणी दूषित नसून ....
निर्वाळा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केले प्रमाणित, प्लाँट सुरू, मास्कुलेटर बंद
तुमसर : कोष्टी तसेच माडगी घाटावरून तुमसर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. पुरवठा होणारे पाणी दूषित नसून ते मिनरल वॉटरपेक्षाही शुद्ध असल्याचा निर्वाळा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता यांनी फिल्टर प्लाँटच्या पाहणी दरम्यान केला.
गत काही दिवसापासून शहरात दूषित पाणी पुरवठा होत असल्याची ओरड आहे. त्याच राजकारण घडवून शहरात असंतोष पोटविण्याचा प्रयत्न झाला. शहरातील नागरिकांना पाण्याचा पुरवठा सुरळीत करता यावा, म्हणून नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाने यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अभियंत्यांना मार्गदर्शन मागितले.
नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या विनंतीवरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता ए. जी. जिभकाटे, सहाय्यक अभियंता संग्राम मस्के, शाखा अभियंता प्रविण मेहर यांच्या चमूने तुमसर येथील फिल्टर प्लाँटला भेट देवून नदीच्या पाण्याचे तसेच फिल्टर झालेल्या पाण्याचे नमुने तपासले. यात नगर परिषदेमध्ये होत असलेल्या पाणी पुरवठ्याच्या तुलनेत कितीतरी पटीने तुमसरचे पाणी निर्मळ असून ते मिनरल वॉटरपेक्षाही शुद्ध असल्याचा निर्वाळा त्यांनी यावेळी दिला.
फिल्टर प्लाँट बंद आहे का? असा प्रश्न उपविभागीय अभियंता यांना विचारला असता फिल्टर प्लाँट बंद नाही, त्यातील मास्कुलेटर केवळ बंद आहे. त्यामुळे पाणी फिल्टर होण्यास काही अडचण निर्माण होत नाही. मास्कुलरचे कार्य हे पाण्यात तुरटी फिरविण्याचे आहे.
पाण्यातला गाळ तळाला आणते. केवळ एवढेच कार्य मास्कुलेटरचे आहे. जर हा मास्कुलेटर सुरु झाल्यास आणखीही शुद्ध पाणी शहाराला मिळू शकते, असेही यावेळी त्यांनी सांगितले. शहरातील नेहरु वॉर्डातील पाण्याच्या टाकीत अशुद्ध पाणी येत असल्याची पुष्टी देत त्यांनी कोष्टी पंपात बिघाड आल्याचे सांगून पाईपलाईन खराब झाली आहे. तशी माहिती नगरपालिकेने दिली असून त्यात कोणत्या पद्धतीने सुधारणा करण्यात येईल, ते नकाशाच्या अभ्यासावरून कळेल. त्यानुसार पालिका प्रशासन लवकरच निर्णय घेणार असल्याचेही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या चमुंनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाणे, संदीप पेठे, मनिष अग्रवाल, राकेश धार्मिक यांच्यासह नगर पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)