राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये लंम्पी दाखल; गोंदिया झाले अलर्ट
By नरेश रहिले | Published: September 11, 2022 10:44 PM2022-09-11T22:44:38+5:302022-09-11T22:45:17+5:30
जनावरे विकत घेऊन आणू नका: गरज पडल्यास व्हॅक्सिनेशन करणार; पशूसंवर्धन विभागाचे आवाहन
नरेश रहिले
गोंदिया: राज्यस्थान, पंजाब व गुजरात जिल्ह्यांमध्ये पशुधनाला त्वचारोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्यांमध्ये पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, खबरदारी करण्याबाबत सूचना वरिष्ठ स्तरावरून पशुसंवर्धन विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता खबरदारीच्या सूचना पशुसंवर्धन विभागाने आपल्या अधिनस्थ यंत्रणेला दिल्या आहेत. महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, जळगाव, अहमदनगर, धुळे, लातुर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, परभणी, नाशिक या १९ जिल्हयामध्ये लंम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. त्यासाठी गोंदियाच्या पशूसंवर्धन विभागाने गोंदियाला अलर्ट केले आहे.
राज्यशासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण राज्य नियंत्रीत क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे राज्यामध्ये सर्व जनावरांचे बाजार पशू प्रदर्शने, आंतरराज्यामधील व राज्यातील जिल्ह्यांतर्गत गोवंशीय व महिषवर्गीय पशुवाहतूक, बैलगाडा शर्यती यावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबत पशुसंवर्धन विभागामार्फत लंम्पी चर्मरोगाच्या प्रादूर्भाव झालेल्या गावापासून ५ कि.मी. परिघातील क्षेत्रामध्ये बाधीत व निगरानी क्षेत्रामध्ये सदर रोगाची साथ रोखण्याकरिता लसीकरण करण्यात येईल. गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सद्यस्थितीत बाहेरून जनावरे खरेदी करून आणू नये, असे आवाहन जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. कांतीलाल पटले यांनी केले आहे.
अशी घ्या खबरदारी
बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्याची व्यवस्थित स्वच्छता ठेवावी. आजारसदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा, योग्य जैवसुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी, बाधित जनावरांवर तत्काळ व योग्य उपचार केले आणि अबाधित क्षेत्र शंभर टक्के लसीकरण केले तर या रोगावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येते.
उपचारापेक्षा प्रतिबंध महत्त्वाचा
लंम्पी त्वचारोगामध्ये जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी येतात तसेच तोंडात घशात व श्वसननलिका, फुप्फुसांत पुरळ व फोड येतात. जनावरांच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ गळती होते. जनावरांना अशक्तपणा येतो व भूक मंदावते. डोळ्यांमध्ये जखमा तयार होतात. या रोगामुळे गाभण जनावरांमध्ये गर्भपात होऊ शकतो. हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये, याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये, याकरिता आवश्यक ती काळजी घ्यावी.
प्राण्यांपासून संक्रमित होत नाही
या विषाणूचे शेळ्या-मेंढ्यांमधील देवीच्या विषाणूशी साधर्म्य आढळून येत असले तरी हा आजार शेळ्या- मेढ्यांना होत नाही. हा आजार जनावरांपासून मानव संक्रमित नाही. या आजाराची देशी वंशाच्या जनावरांपेक्षा संकरित जनावरांना लागण होण्याची शक्यता अधिक असते.
काय आहे आजार व लक्षणे?
लम्पी त्वचारोग हा गोवंश व महिषवर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. या आजारासाठी कारणीभूत असणारे विषाणू हे देवी विषाणू गटातील कॅप्रिल्पॉक्स या प्रवर्गात मोडतात. जनावरांच्या शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात.
लम्पी हा आजाराचा प्रादुर्भाव राज्यस्थान, पंजाब व गुजरातच्या काही जिल्ह्यांत आढळून आला आहे. आजघडीला पशुधनामध्ये हा आजार जिल्ह्यात कुठेही आढळून आलेला नाही. खबरदारीचा एक भाग म्हणून पशुसंवर्धन विभाग दक्षता ठेवून आहे. -डॉ. कांतीलाल पटले, जिल्ह पशुसंवर्धन अधिकारी गोंदिया.
नऊ आरआरटी पथके तयार
गोंदिया जिल्ह्यात लम्पीने जर पाय टाकलाच तर त्याला वेळीच आळा घालण्यासाठी पशूसंवर्धन विभागाने नऊ शिघ्र संवेदना पथक (आरआरटी) पथके तयार केले आहेत. या नऊ पथकात २७ पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.