वासनांध तरुणाला सहा वर्षांचा कारावास; जिल्हा न्यायालयाचा निकाल
By कपिल केकत | Published: August 31, 2023 07:12 PM2023-08-31T19:12:39+5:302023-08-31T19:12:59+5:30
अल्पवयीन मुलाला आपल्या वासनेची शिकार बनविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वासनांध तरुणाला जिल्हा न्यायालयाने पाच वर्षे कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
गोंदिया : अल्पवयीन मुलाला आपल्या वासनेची शिकार बनविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वासनांध तरुणाला जिल्हा न्यायालयाने पाच वर्षे कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायालयाने गुरुवारी (दि. ३१) आपला निर्णय सुनावला आहे. फिर्यादी व आरोपी अजय उर्फ अज्जू रामचंद धामेचा (३६, रा. संत कंवरराम वॉर्ड, तिरोडा) हे मित्र आहेत. मात्र असे असतानाही वासनांध अजय धामेचा याने त्यांच्या अल्पवयीन मुलाला चॉकलेट व चारचाकी वाहनाने फिरवून आणतो, असे सांगून ग्राम बिरसी येथे नेले होते. आरोपीने लैंगिक शोषण करण्याच्या उद्देशातून अल्पवयीन मुलाचा गुप्त भाग हाताळला तसेच त्याच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी मारहाण करून दुखापत केली होती. ७ जुलै २०१६ रोजी सायंकाळी ७ वाजतादरम्यान घडलेल्या या प्रकरणात ८ जुलै २०१६ रोजी तिरोडा पोलिसांत भादंवि कलम ३२४, ३२३ सहकलम ४, ६, ८ पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल उजवणे यांनी केला होता. प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान गुरुवारी (दि. ३१) जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी पोक्सो कलम ९(एम), १० मध्ये आरोपीला पाच वर्षांची शिक्षा तसेच दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.