प्रदूषणमुक्त वातावरणासाठी माँ बम्लेश्वरीची सायकलवारी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:27 AM2021-02-12T04:27:06+5:302021-02-12T04:27:06+5:30
गोंदिया : जेसीआई गोंदिया राईस सिटी व आज फोरम यांच्या संयुक्तवतीने राबविण्यात येत असलेल्या 'एक दिन सायकल के ...
गोंदिया : जेसीआई गोंदिया राईस सिटी व आज फोरम यांच्या संयुक्तवतीने राबविण्यात येत असलेल्या 'एक दिन सायकल के नाम' या उपक्रमांतर्गत प्रदूषणमुक्त व निरोगी आरोग्यासाठी माँ बम्लेश्वरी धाम म्हणून प्रसिद्ध असलेल्या छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथे मातृ-पितृ दिनानिमित्त रविवारी (दि. १४) सायकलवारी काढण्यात येणार आहे.
सन २०१७ पासून जेसीआई गोंदिया राईस सिटी व आज फोरम यांच्या संयुक्तवतीने 'एक दिन सायकल के नाम' हा उपक्रम शहरातून सुरू करण्यात आला आहे. यांतर्गत प्रत्येक रविवारी सायकल चालवून शहरवासीयांना निरोगी आरोग्य व प्रदूषण मुक्तीचा संदेश दिला जात आहे. या अभियानातील दोन युवक ‘प्रदूषणमुक्त भारत’चा संदेश घेत वाघा बॉर्डरपर्यंत पोहचले आहेत. या अभियानाच्या माध्यमातून इंधन बचत, निरोगी आरोग्य व प्रदूषण मुक्तीसाठी शेकडो युवकांनी सायकल यात्रा सुरू केली आहे. हाच संदेश लगतच्या राज्यातही पोहचावा या उद्देशाला घेऊन छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथील प्रसिध्द माँ बम्लेश्वरीचे दर्शन घेण्यासाठी व हा संदेश हजारो भक्तांच्या माध्यमातून पोहचावा म्हणून येथून रविवारी (दि. १४) सायकल यात्रा करीत डोंगरगड येथे पोहचणार आहे. या यात्रेची सुरूवात वृत्तपत्र विक्रेत्यांकडून हिरवी झेंडी दाखवून होणार आहे. तर आमगाव येथे पर्यावरण संवर्धन-संरक्षण आघाडी तसेच सालेकसा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व पोलीस विभागाकडून स्वागत करण्यात येणार आहे.
-----------------------------
अभियानात सामील व्हा
देशाला प्रदूषणमुक्त करण्यासाठी व आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी या सायकल यात्रेत इच्छुक युवक-युवतींनी सहभागी व्हावे असे आयोजकांनी कळविले आहे. यासाठी मंजू कटरे, रवी सपाटे, विजय येडे, दीपक गाडेकर, साहिल खटवानी, अशोक मेश्राम, श्रदा यादव, कल्याणी गाडेकर, स्वाती जैन, भूमी खटवानी व शिवम पटले यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.