मग्रारोहयोची विहीर झाली गायब
By admin | Published: October 14, 2016 02:11 AM2016-10-14T02:11:36+5:302016-10-14T02:11:36+5:30
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील निमगाव येथे सरपंचपुत्राच्या शेतात बांधलेली सिंचन विहीर गायब झाली आहे.
सरपंचपुत्राचा प्रताप : आयुक्तांच्या आदेशानंतरही कारवाई थंडबस्त्यात
गोंदिया : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील निमगाव येथे सरपंचपुत्राच्या शेतात बांधलेली सिंचन विहीर गायब झाली आहे. या विहिरीच्या बांधकामासाठी झालेला खर्च १ लाख २४ हजार ९५३ शासकीय यंत्रणेने अदाही केला. मात्र आता ज्या गटात ती विहीर खोदली होती तेथून ती विहीरच गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला.
या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या रोजगार हमीच्या यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. शासनाची दिशाभूल करून फसवणूक करण्याच्या या प्रकाराबद्दल संबंधित लाभार्थ्यासह सर्व यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी गावातील काही सूज्ञ लोकांनी केली आहे. मात्र अद्याप कोणावरही कोणतीही कारवाई झालेली नाही.
प्राप्त माहितीनुसार, निमगाव येथील सरपंच देवाजी डोंगरे यांचे पूत्र राजेश यांनी म.ग्रा.रो.ह.यो.अंतर्गत आपल्या शेतात (गट क्रमांक १४२ मध्ये ) सिंचन विहिर बांधण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार सरपंचपदाच्या प्रभावाने २१ एप्रिल २०११ च्या ग्रामसभेत त्यांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. सदर सिंचन विहीरीचे बांधकाम २०१४-१५ मध्ये पूर्ण झाल्याचे दाखवून पैशाचीही उचल करण्यात आली.
दरम्यान गावातील काही जागरूक नागरिकांनी शंका आल्यानंतर पाहणी केली असता ज्या गट क्रमांकात विहिरी मंजुर होती तिथे विहिरीचे बांधकामच केले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे देवाजी महारू कोल्हे यांनी गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मनरेगा) यांच्या पत्रानुसार अर्जुनी मोरगावचे गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी चौकशी केली असता ज्या गटात (क्रमांक १४२) डोंगरे यांनी विहीर बांधल्याचे दर्शविले होते त्या घटात विहिरच नसल्याचे दिसून आले. वास्तविक जी सिंचन विहीर बांधली ती राजेश डोंगरे यांच्या नावे असलेल्या शेतात नसून त्यांच्या आई मनोरमा यांच्या नावाने असलेल्या गटात असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)