मग्रारोहयोतील मजुरीचा अपहार

By admin | Published: June 26, 2016 01:43 AM2016-06-26T01:43:27+5:302016-06-26T01:43:27+5:30

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात नेहमी वादात राहणाऱ्या देवरी पंचायत समितीमध्ये आणखी एक घोळ समोर आला आहे.

Magnificent wage slaughter | मग्रारोहयोतील मजुरीचा अपहार

मग्रारोहयोतील मजुरीचा अपहार

Next

कॉम्प्युटर आॅपरेटरचा प्रताप : लाखो रुपये टाकले नातेवाईकांच्या खात्यात
देवरी : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात नेहमी वादात राहणाऱ्या देवरी पंचायत समितीमध्ये आणखी एक घोळ समोर आला आहे. मग्रारोहयोत काम करणाऱ्या मजुरांची लाखो रुपयांची मजुरी डाटा एन्ट्री आॅपरेटरने आपल्या नातेवाईकाच्या खात्यात वळती करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, अहमद अब्बास अली सय्यद हा सन २०१३ पासून महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना कार्यालयात डाटा एन्ट्री आॅपरेटर पदावर कार्यरत होता. त्याने तलाव खोलीकरण व पांदण रस्त्याच्या कामातील मजुरांच्या मजुरीच्या लाखो रुपयांचा अपहार करुन ते पैसे आपल्या नातेवाईकाच्या खात्यात वळते करण्याचा प्रकार एक वर्षाअगोदर घडला. परंतु पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या कृपेने हे प्रकरण अजुनपर्यंत बाहेर आले नाही. एक वर्षानंतरही मजुरांचे पैसे त्यांच्या खात्यात न आल्याने त्यांनी चौकशी केली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी खंडविकास अधिकारी मेश्राम यांच्याकडून अहमद अब्बास अली सैय्यदला कारण दाखवा नोटीस देण्यात आली आहे.
एक वर्षाअगोदर घडलेल्या या प्रकाराला खंडविकास अधिकारी मेश्राम व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गौतम साखरे तेवढेच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. या अधिकाऱ्यांनी आॅपरेटरवर अजूनपर्यंत फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसात तक्रार केली नाही. सदर डाटा एन्ट्री आॅपरेटरने काही पैसे भरुन दिल्याचे बोलले जात आहे.
याप्रकरणी खंडविकास अधिकारी मेश्राम यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क केला असता संपर्क होवू शकला नाही. याबाबत मग्रारोहयोचे सहायक कार्यक्रम अधिकारी गौतम साखरे यांना विचारले असता त्यांनी या प्रकरणी सांगायला टाळाटाळ केली. ते म्हणाले, या प्रकरणात भ्रष्टाचार झालेला आहे. डाटा एन्ट्री आॅपरेटरने आपल्या नातेवाईकाच्या खात्यात मजुरांचे लाखो रुपये परस्पर ट्रान्सफर केले आहे. या प्रकरणात जि.प. गोंदियाच्या पाच लोकांची चमू तपास करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु ही घटना कोणत्या गावची आहे व एकूण किती रुपयांचा अपहार झाला हे सांगण्याचे त्यांनी टाळले.
विशेष म्हणजे देवरी पंचायत समिती अंतर्गत मग्रारोहयोच्या अनेक कामात लाखोचा अपहार झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी आलेवाडा येथे विंधन विहिरीत झालेल्या घोटाळ्याची चौकशी अजूनपर्यंत सुरू असून कोणावरच कारवाई झालेली नाही हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Magnificent wage slaughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.