महागाव महसूल मंडळात धानपिकांना जबर फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 09:52 PM2017-10-20T21:52:27+5:302017-10-20T21:52:40+5:30
तालुक्यात १३ व १४ आॅक्टोबर रोजी महागाव महसूल मंडळात अचानक झालेला चक्रीवादळ व पावसाच्या तडाख्यामुळे हजारो हेक्टर मधील धान पीकाला फटका बसला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : तालुक्यात १३ व १४ आॅक्टोबर रोजी महागाव महसूल मंडळात अचानक झालेला चक्रीवादळ व पावसाच्या तडाख्यामुळे हजारो हेक्टर मधील धान पीकाला फटका बसला आहे. वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अद्यापही सर्वेक्षण करण्यात आले नाही. खासदार नाना पटोले यांनी बाधित क्षेत्राच्या जानवा गावाला मंगळवारी भेट देवून शेतकºयांना संयम राखण्याचे आवाहन केले.
आसमानी व सुलतानी संकटामुळे बळीराजा सदैव त्रस्त असतो. दुष्काळाच्या दुष्टचक्राचे वलय सदैव त्याचा पाठलाग करीत असते. अवसायनात जीवन कंठीत असताना कर्जबाजारीपणा दूर होत नाही. तोच पुन्हा एकदा महागाव महसूल मंडळातील शेतकºयांवर एकाएकीच आभाळ कोसळले. १३ व १४ तारखेला आलेल्या वादळी पावसाने बळीराजाच्या तोंडात आलेला घास निसर्गाने हिरावला. शेतात झोपलेले धानपिक बघून त्यांचे डोळे पाणावले. शेतकºयांनी याची माहिती देताच खासदार पटोले यांनी मंगळवारी जानवा गावाला रात्री भेट देवून शेतातील धान पिकाची पाहणी केली. लगेच त्यांनी जिल्हाधिकाºयांशी शेतकºयांच्या व्यथा संदर्भात चर्चा केली. या नैसर्गिक संकटामुळे ७० टक्के धानपिकाचे नुकसान झाले आहे. या धानपीकाला तुडतुडा या किटकाचा प्रादुर्भाव आहे. पण निद्रावस्थेत असलेल्या धानपिकावर किटकनाशक फवारणी करणे सुद्धा शेतकºयांना शक्य नाही. हताश होऊन शेवटी तशाच अवस्थेत त्यांनी हे धानपिक सोडून दिले. यापूर्वी याच परिसरात २८ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसानेही धानपिकाची नासाडी केली होती. परिपक्वतेच्या वाटेवर असलेले हे धानपिक कापणी सुद्धा करु शकत नाही, अशी विदारक अवस्था परिसरातील शेतकºयांची आहे.
यावेळी पटोले यांनी शेतकºयांना धीर दिला. ते म्हणाले पीक विम्याची योजना चुकीची आहे. पीक विमा काढलेल्या शेतकºयांना नुकसानभरपाई मिळायला हवी. हवामानाच्या आधारावर विमा मिळायला पाहिजे अशी मागणी आपण केंद्र शासनाकडे केली आहे. कर्जमाफीचे शासनाचे धोरण चुकीचे आहे. कर्ज भरणा केला त्यांना व ज्यांनी केला नाही अशानांही कर्जमाफीचा लाभ मिळायला हवा. आॅनलाईन पद्धत व सर्व्हर डाऊनमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.अनेकांचे अर्ज करुन देखील ते अपलोड झाले नाहीत. त्यामुळे सर्व शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी. ओरिसा राज्यात धानाला २९९० रुपये प्रतिक्विंटल भाव तर महाराष्टÑात १५५० रुपये एवढा आहे. ही विषयमता का? असा प्रश्न निर्माण करुन शेतकºयांना प्रतिक्विंटल एक हजार रुपये बोनस देण्याची मागणी त्यांनी केली. शेतकºयांना धैर्य देताना एकोप्याने संकटाला सामोरे जा. प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन केले.