महाराष्ट्रात आघाडीचे नव्हे तर एखाद्या टोळीचे राज्य : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2022 06:40 PM2022-02-04T18:40:11+5:302022-02-04T18:52:15+5:30
महाराष्ट्रात भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. एखाद्या टोळीचे राज्य आहे की काय असे वाटू लागले आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
गोंदिया : सध्या महाराष्ट्रात जे काही सुरू आहे, तो सर्व महाराष्ट्राला लाजवणारा व्यवहार चाललेला आहे. एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष स्वस्थ बसणार नाही. परमवीर सिंह यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर आरोप केले आहेत. त्यासाठी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. ते राजीनामा देणार नसतील तर मग अनिल देशमुख यांचा राजीनामा कशाला घेतला, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार याचा अपघातात मृत्यू झाला होता. रहांगडाले कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी चंद्रकांत पाटील शुक्रवारी (दि. ४) तिरोड्याला आले होते. तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते. लोकांना निवडणुका येईपर्यंत थांबावे लागते, पण आम्ही थांबू शकत नाही. कारण अनिल देशमुख यांच्यावर देखील परमवीर सिंह यांनी आरोपच केले होते. त्यापुढे काही झाले नव्हते, चौकशी पुढे जायचीच होती आणि राजीनामा घेतला गेला. आता तर अनिल देशमुखांना सर्वांनी वाऱ्यावर सोडून दिले आहे. आता मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे पाटील म्हणाले.
महाराष्ट्रात भयंकर स्थिती
एखाद्या टोळीचे राज्य आहे की काय, असे वाटू लागले आहे. राज्याचे मुख्य सचिव म्हणतात की, अनिल देशमुख मला चिठ्ठी आणून द्यायचे. परमबीर सिंह म्हणतात की, सचिन वाझेंची नियुक्ती करण्यासाठी मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री यांनी आग्रह धरला होता अन् तिकडे अनिल परबांच्या १०० कोटी रुपयांच्या रिसॉर्टला तोडण्यासाठी केंद्रीय पर्यावरण खात्याची नोटीस निघते, अशा एक एक घटना सांगत, काय चाललंय काय महाराष्ट्रात, असा सवाल त्यांनी केला.
आता कुर्सी खाली करो म्हणण्याची वेळ
आता तर किराणा दुकानांतून वाईन विकण्याची परवानगी दिली आहे. हे होईल असे सरकारला वाटत आहे. पण वाईन विक्री सुरू होताच महिलांचे मोर्चे दुकानांवर आणि मंत्र्यांच्या घरांवर धडकतील, तेव्हा सरकारला कळेल. आता जनता जागली आहे. ‘कुर्सी खाली करो, असे सरकारला म्हणण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.