Maharashtra Election 2019 : माघारीनंतर मतदारसंघातील लढतींचे चित्र स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 12:41 AM2019-10-08T00:41:45+5:302019-10-08T00:42:20+5:30
शेवटच्या दिवसानंतर २४ उमेदवारांनी माघार घेतल्याने जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील अंतीम लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. गोंदिया, तिरोडा आणि आमगाव मतदारसंघात तिहेरी तर अर्जुनी मोरगाव मतदारसंघात दुहेरी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रमुख राजकीय पक्षाच्या बंडखोर उमेदवारांनी माघार न घेतल्याने मतांचे ध्रुवीकरण होऊन विजयाचे समीकरण बिघडण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर २४ उमेदवारांनी माघार घेतल्याने जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील अंतीम लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. गोंदिया, तिरोडा आणि आमगाव मतदारसंघात तिहेरी तर अर्जुनी मोरगाव मतदारसंघात दुहेरी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रमुख राजकीय पक्षाच्या बंडखोर उमेदवारांनी माघार न घेतल्याने मतांचे ध्रुवीकरण होऊन विजयाचे समीकरण बिघडण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांची संख्या चारही मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे. आमदार होण्यासाठी या इच्छुकांनी मागील पाच वर्षांपासून मतदारसंघात तशी पेरणी करण्यास सुरूवात केली होती. तर काहींनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे उमेदवारी मिळविण्यासाठी फिल्डींग लावली होती. मात्र उमेदवारी जाहीर करताना पक्षश्रेष्ठींनी आपले पॅरामीटर लावल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोढ झाला आहे.त्यातच लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या दमदार यशानंतर या पक्षात आयारामांची संख्या वाढली. मेगा भरतीमुळे पक्षातील अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांची गोची झाली तर काहींचा उमेदवारी मिळण्याचा पत्ता ऐनवेळी कट झाला. त्यामुळे असंतुष्ठांची संख्या वाढली. पक्षाने आपल्याला ऐन निवडणुकीच्या तोंडावर डावलल्याच्या भावनेतून सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी बंडाचे निशाण उभारत उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत बंडखोरांचे मन वळविण्यात पक्षाच्या जेष्ठ नेत्यांना यश येईल अशी आशा अधिकृत उमेदवारांना होती. मात्र अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ वगळता तीन्ही मतदारसंघात बंडखोरांचे आव्हान कायम आहे. गोंदिया विधानसभा मतदारसंघात भाजपने काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले आ.गोपालदास अग्रवाल यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मागील पाच वर्षांपासून या मतदारसंघात भाजपतर्फे तयारी करीत असलेले माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांचा पत्ता कट झाला. त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करुन निवडणूक लढविण्यावर ठाम राहण्याचा निर्धार केल्याने पक्षाची सुध्दा अडचण झाली आहे.तर काँग्रेसने अमर वºहाडे यांना उमेदवारी जाहीर केली. या दोन्ही उमेदवारांच्या तुलनेत वºहाडे यांना हा मतदारसंघ नवीन आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे.
अर्जुनी मोरगाव मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ८ बंडखोर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचे उमेदवार राजकुमार बडोले विरुध्द राष्टÑवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापूरे असा सामना रंगणार आहे.तिरोडा मतदारसंघात राष्टÑवादी काँग्रेसचे माजी आ.दिलीप बन्सोड यांनी आपली बंडखोरीची भूमिका कायम ठेवल्याने या मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे. भाजपचे उमेदवार विजय रहांगडाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुड्डू बोपचे आणि अपक्ष उमेदवार दिलीप बन्सोड असा तिहेरी सामना या मतदारसंघात पाहयला मिळेल. आमगाव मतदारसंघात सुध्दा तिहेरी लढत होणार असल्याचे चित्र काँग्रेसचे माजी आ.रामरतन राऊत यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात भाजपचे उमेदवार संजय पुराम, काँग्रेसचे सहषराम कोरोटे आणि अपक्ष उमेदवार रामरतन राऊत यांच्यात तिहेरी लढत होणार आहे. पक्षातून बंडखोरी करणारे तीन्ही मतदारसंघातील उमेदवार हे दिग्गज असल्याने मत विभाजनाचा फटका पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिन्ही मतदारसंघातील विजयाच्या समीकरण सुध्दा बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.