Maharashtra Election 2019 : व्हॉट्सअॅप प्रचारावर ‘कंट्रोल’ कुणाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 12:43 AM2019-10-08T00:43:55+5:302019-10-08T00:44:31+5:30
‘व्हॉट्सअॅप’ सारख्या ‘अॅप’वरील प्रचारावर नजर ठेवण्यासाठी ‘सायबर सेल’ तसेच आयोगाकडे यंत्रणाच उपलब्ध नाही. अशात निवडणुकांचा प्रचार संपल्यानंतर मतदानापर्यंत नियमांना डावलून ‘सोशल मीडिया’वर प्रचाराची धुरळ उडतच राहण्याचे चिन्ह आहेत. या प्रचारावर आयोग लक्ष ठेवणार तरी कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवारांकडून प्रचाराच्या आजवरच्या पद्धतींवर जोर दिला जात असतानाच ‘सोशल मीडिया’कडे मात्र त्यांचा जास्त कल दिसून येत आहे. ‘व्हॉट्सअॅप’ ‘फेसबुक’सह विविध माध्यमांतून निवडणूक प्रचार सुरू आहे. अशात उमेदवारांच्या ‘सोशल मीडिया’वरील प्रचारावर बारकाईने लक्ष ठेवणार असल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला आहे.
मात्र प्रत्यक्षात ‘व्हॉट्सअॅप’ सारख्या ‘अॅप’वरील प्रचारावर नजर ठेवण्यासाठी ‘सायबर सेल’ तसेच आयोगाकडे यंत्रणाच उपलब्ध नाही.
अशात निवडणुकांचा प्रचार संपल्यानंतर मतदानापर्यंत नियमांना डावलून ‘सोशल मीडिया’वर प्रचाराची धुरळ उडतच राहण्याचे चिन्ह आहेत.
या प्रचारावर आयोग लक्ष ठेवणार तरी कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
निवडणुकांत उमेदवारांच्या ‘सोशल मीडिया’वरील प्रचारावर बारीक नजर राहणार असल्याचा इशारा निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे. यासंदर्भात लक्षदेखील ठेवले जात असून त्याच्या खर्चाची आकडेवारीही उमेदवार आयोगाकडे सादर करीत आहेत. विविध संकेतस्थळांसोबतच ‘व्हॉट्सअॅप’वर सर्वात जास्त प्रचार होताना दिसत आहे. या माध्यमातून एकाच वेळी व कमी खर्चात जास्त उमेदवारांपर्यंत पोहचणे शक्य असल्याने अनेक उमेदवारांची प्रचार यंत्रणा यावर भर देत आहे. उमेदवारांच्या ‘सोशल मीडिया हँडलर्स’ तसेच कार्यकर्त्यांक डून विविध ‘ग्रुप’ तयार करण्यात आले असून दररोज शहरातील लाखो लोकांपर्यंत विविध ‘ग्रुप्स’च्या माध्यमातून संदेश पोहचत आहेत. निवडणूक आयोगाने ‘सोशल मीडिया’वरील प्रचारावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे. मात्र ‘व्हॉट्सअॅप’वरील संदेशांची चाचपणी करणे ही कठीण बाब आहे. शिवाय उमेदवारांचे कार्यकर्ते व प्रचार यंत्रणा लक्षात घेता प्रत्येकाच्या फोनमधील ‘व्हॉट्सअॅप’ची तपासणी करणे शक्यच नाही. ‘व्हॉट्सअॅप’वर नेमक्या कुठल्या संदेशाची देवाण-घेवाण होत आहे, यावर लक्ष ठेवण्याची यंत्रणा आयोगाकडे नाही. मात्र प्रचार यंत्रणेतून कार्यकर्ते व नातेवाईकांच्या माध्यमातून ‘व्हॉट्सअॅप’वर प्रचाराची रणधुमाळी सुरूच राहील, असे दिसून येत आहे.
पोलिसांकडेही
यंत्रणा नाही
पोलिसांच्या ‘सायबर सेल’कडे एखाद्याच्या ‘व्हॉट्सअॅप’वरून किती संदेश चालले आहे, हे सांगणारी यंत्रणा उपलब्ध नाही. केवळ एखाद्या ‘ग्रुप’वर संदेश आला असेल आणि आपला क्रमांक त्यात असेल तर कुणी संदेश पाठविला, हे कळू शकते. मात्र प्रत्यक्ष वैयक्तिक क्रमांकाचे ‘ट्रॅकिंग’ करणे शक्य नसल्याची माहिती आहे.