Maharashtra Election 2019 ; सर्वच उमेदवारांचे मतदारसंघात शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 06:00 AM2019-10-20T06:00:00+5:302019-10-20T06:00:21+5:30

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, गोंदिया,अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा या चारही मतदारसंघातून एकूण ४७ उमेदवार रिंगणात आहे.९ आॅक्टोबरपासून सर्वच उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केली.त्यामुळे मागील १०-१२ दिवस मतदारसंघात प्रचारसभा,पदयात्रा आणि रॅलीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.

Maharashtra Election 2019 ; Demonstration of power in the constituency of all candidates | Maharashtra Election 2019 ; सर्वच उमेदवारांचे मतदारसंघात शक्तिप्रदर्शन

Maharashtra Election 2019 ; सर्वच उमेदवारांचे मतदारसंघात शक्तिप्रदर्शन

Next
ठळक मुद्देजाहीर प्रचार बंद। आता मतदारांच्या थेट भेटीवर लक्ष : उमेदवारांसाठी रविवारचा दिवस महत्त्वपूर्ण, निवडणूक यंत्रणा सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गेल्या दहा बारा दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात मतदारांनो लक्ष असू द्या सह ऐका हो ऐकाचा आवाज घुमत होता. शनिवारी (दि.१९) सायंकाळी ६ वाजतानंतर उमेदवारांना जाहीर प्रचार करता येणार नसल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख उमेदवारांनी आपआपल्या मतदारसंघात रॅली,पदयात्रा काढून शक्तिप्रदर्शन केले. आपल्या मागे मतदारसंघातील किती कार्यकर्ते आणि जनता आपल्या पाठीशी हे दाखविण्यासाठी ढोलताशांच्या गजरात रॅली आणि पदयात्रा काढून आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला.
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, गोंदिया,अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा या चारही मतदारसंघातून एकूण ४७ उमेदवार रिंगणात आहे.९ ऑक्टोबरपासून सर्वच उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केली.त्यामुळे मागील १०-१२ दिवस मतदारसंघात प्रचारसभा,पदयात्रा आणि रॅलीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.
जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील उमेदवार आणि पक्षाचे कार्यकर्ते भाऊ लक्ष असू द्या असे सांगत फिरत असल्याचे चित्र होते.त्यामुळे काही गावात तर दिवाळीपूर्वीच दिवाळीचे चित्र होते. निवडणुकीमुळे हॉटेल, चहा टपऱ्या आणि ढाब्यांवरील गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली होती. २१ ऑक्टोबरला मतदान होणार असल्याने आपले कार्यकर्ते दुखावू नये, मतदारसंघात आपली तयार झालेली हवा कायम राहावी याची सर्वच पक्षाचे उमेदवार काळजी घेत होते. त्यातच आता मतदानासाठी केवळ एक दिवस शिल्लक असल्याने आतापर्यंत केलेली मेहनत वाया जाऊ नये याची सुध्दा उमेदवार आणि त्यांच्या पक्षाकडून काळजी घेतली जात होती. मात्र मतदानाच्या ४८ तासांपूर्वी जाहीर प्रचार बंद करावा लागतो.
त्यामुळे शनिवारी सांयकाळी ६ वाजेच्या आत सर्वच उमेदवारांनी सभा,पदयात्रा आणि रॅली घेण्याचे नियोजन केले होते. ढोल ताशांच्या गजरात मतदारसंघात रॅली काढून मतदानापूर्वी वातावरण निर्मिती केली. आता जाहीर प्रचार बंद झाला असल्याने उमेदवार आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांच्या गृहभेटीवर लक्ष केंद्रीत केले आहे.

काही अपवाद वगळता मोठ्या नेत्यांच्या सभा नाही
गोंदिया जिल्ह्यातील चारही मतदारसंघात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा.प्रफुल्ल पटेल, वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर या नेत्यांच्या सभा वगळता इतर कोणत्याही मोठ्या नेत्यांची सभा झाली नाही.त्यातही नितीन गकडरी यांची शुक्रवारी गोंदिया येथे आयोजित सभा रद्द झाली. तर प्रफुल्ल पटेल यांनी सात आठ सभा घेतल्या. तर जाहीर प्रचाराच्या अखेरच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी गोंदिया विधानसभा क्षेत्रातील रावणवाडी येथे सभा घेतली. या व्यतिरीक्त एकाही मोठ्या नेत्याची सभा झाली नाही. विशेष म्हणजे लगतच्या भंडारा जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तीन सभा झाल्या.
दोन मतदारसंघात तीन तासपूर्वीच प्रचार बंद
जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव आणि आमगाव हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ नक्षलग्रस्त असल्याने या मतदारसंघात मतदानाची वेळ ही सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शनिवारी दुपारी ३ वाजताच जाहीर प्रचार बंद करण्यात आला होता. या वेळेपूर्वी रॅली, पदयात्रा काढण्याचा उमेदवारांनी प्रयत्न केला.
हवा कुणाची कळणार गुरूवारी
विधानसभा निवडणुकीला घेऊन मागील दहा बारा दिवस सर्वच पक्षाचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून मतदारसंघात आपली हवा असल्याचे दावे केले जात होते. मात्र मतदारसंघात कुणाची हवा कितीही असली तरी मतदारांच्या मनात नेमके काय दडले आहे. हे गुरूवारी मतमोजणीनंतर कळणार आहे.
निवडणूक विभागाची चाचपणी
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १२८२ मतदान केंद्रावरुन १० लाख ९८ हजार ४७६ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. यासाठी ईव्हीएम, व्हीव्हीटी पॅट आणि मतदान केंद्रावर ऐनवेळी कुठल्या साहित्याची कमतरता भासू नये यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने शनिवारीच या सर्व गोष्टींची चाचपणी करुन घेतली.
मतदानाचा टक्का वाढविण्यावर भर
निवडणूक विभागाने यंदा विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी शाळा, महाविद्यालय आणि गावांमध्ये विविध जनजागृती उपक्रम राबविले. २९ कि.मी.ची मानवी साखळी तयार करुन गोंदिया येथे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.एकंदरीत या सर्व उपक्रमाचा उद्देश हा केवळ मतदानाचा टक्का वाढविणे हाच होता.
रविवारची रात्र वैºयाची आहे
विधानसभा निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मागील काही महिन्यांपासून मेहनत घेतली. २१ आॅक्टोबर सोमवारी मतदान होणार असल्याने त्यापूर्वी म्हणजे रविवारची रात्र सर्वच ४७ उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण आहे. या रात्रभरात निवडणुकीची बरीच समीकरणे सुध्दा बदलण्याची शक्यता असते. त्यामुळे केलेली मेहनत वाया जाऊ नये,यासाठी रविवारच्या सर्व घडामोडींवर उमेदवारांना लक्ष ठेवावे लागणार असल्याने त्यांच्यासाठी ही रात्र वैऱ्याची आहे.
भर पावसातही उमेदवारांचे शक्ती प्रदर्शन
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करण्याचा शनिवार हा शेवटचा दिवस होता.त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी केली होती.मात्र दुपारच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोढ झाला होता.मात्र काही उमेदवारांनी भर पावसातही शक्ती प्रदर्शन करुन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Demonstration of power in the constituency of all candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.