Maharashtra Election 2019 ; जिल्ह्यात सरासरी ६६.८६ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 06:00 AM2019-10-23T06:00:00+5:302019-10-23T06:00:18+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी चारही मतदारसंघात एकूण ४७ उमेदवार रिंगणात होते. यासाठी सोमवारी जिल्ह्यातील एकूण १२८२ मतदान केंद्रावरुन मतदानाची प्रक्रिया घेण्यात आली. जिल्ह्यातील एकूण १० लाख ९८ हजार २७० मतदारांपैकी सोमवारी एकूण महिला ३ लाख ७० हजार ६४८ तर पुरूष ३ लाख ६२ हजार २२० अशा एकूण ७ लाख ३२ हजार ८८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. मतदानाची एकूण टक्केवारी ६६.८६ टक्के आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, तिरोडा, गोंदिया, आमगाव या चारही मतदारसंघात सोमवारी (दि.२१) सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण सरासरी ६६.८६ टक्के मतदान झाले. सोमवारी सायंकाळी उशीरापर्यंत मतदान सुरू असल्याने निवडणूक विभागाने मतदानाची अंतीम आकडेवारी जाहीर केली नव्हती. त्यामुळे जिल्ह्यात निश्चित किती टक्के मतदान झाले हा आकडा स्पष्ट झाला नव्हता. मात्र मतदानाची टक्केवारी पाहता २०१४ निवडणुकीच्या तुलनेत चारही मतदारसंघातील मतदानाच्या टक्केवारीत घट झाली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी चारही मतदारसंघात एकूण ४७ उमेदवार रिंगणात होते. यासाठी सोमवारी जिल्ह्यातील एकूण १२८२ मतदान केंद्रावरुन मतदानाची प्रक्रिया घेण्यात आली. जिल्ह्यातील एकूण १० लाख ९८ हजार २७० मतदारांपैकी सोमवारी एकूण महिला ३ लाख ७० हजार ६४८ तर पुरूष ३ लाख ६२ हजार २२० अशा एकूण ७ लाख ३२ हजार ८८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. मतदानाची एकूण टक्केवारी ६६.८६ टक्के आहे. विधानसभा निहाय मतदानाची टक्केवारी पाहता अर्जुनी मोरगाव विधानसभा ६९.८६ टक्के, तिरोडा ६५.३४ टक्के, गोंदिया ६४.५५ टक्के, आमगाव ६८.३० टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात झाले तर गोंदिया विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले आहे. विशेष म्हणजे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मतदार अधिक जागृत दिसून आले. नक्षलग्रस्त अर्जुनी मोरगाव आणि आमगाव विधानसभा मतदारसंघात अधिक मतदान झाले आहे. विशेष म्हणजे निवडणूक विभागाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती. जिल्हा निवडणूक विभागाने यासाठी २९ कि.मी.ची मानवी श्रृंखला तयार करुन मतदार जनजागृती केली. तर पथनाट्य आणि इतर कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र जिल्ह्यातील एकूण मतदानाची टक्केवारी पाहता जनजागृती अभियानाचा कुठलाच फरक पडला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हे अभियान म्हणजे मागे पाठ आणि पुढे सपाट असेच ठरले.
२०१४ निवडणुकीत चारही मतदारसंघात अधिक मतदान झाले होते. त्या तुलनेत यंदा मात्र फार कमी मतदान झाले आहे. ग्रामीण भागात मतदानासाठी महिलांमध्ये उत्साह दिसून आला. शहरी भागात मतदानाप्रती फारसा उत्साह दिसून आला नाही. ते मतदानाच्या टक्केवारीवरुन सुध्दा दिसून येते.जनजागृतीनंतरही मतदानाचा टक्का वाढत नसल्याने मंथन करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
मतदानातही महिलाच पुढे
गोंदिया जिल्ह्यात एकूण १० लाख ९८ हजार २७० मतदार आहेत. यात महिला मतदारांची संख्या अधिक आहे. सोमवारी विधानसभेसाठी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत चार मतदारसंघात एकूण ७ लाख ३२ हजार ८६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. यात ३ लाख ६२ हजार २२० पुरूष तर ३ लाख ७० हजार ६४८ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. मतदान करणाऱ्या महिला मतदारांची टक्केवारी ६७.०४ टक्के आहे तर पुरूष मतदारांची टक्केवारी ही ६६.४१ टक्के आहे. त्यामुळे मतदानातही महिलाच पुढे असल्याचे चित्र आहे. .
लाखो रुपयांचा खर्च व्यर्थ
निवडणूक विभागाने मतदारांमध्ये जनजागृती करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र मतदानाची टक्केवारी पाहता मागील निवडणुकीच्या तुलनेत त्यात वाढ होण्याऐवजी घट झाली आहे. त्यामुळे जनजागृतीवर प्रशासनाने केलेला खर्च सुध्दा व्यर्थ ठरला आहे.
शहरी मतदारांमध्ये निरूत्साह
जिल्ह्यातील आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त आमगाव आणि अर्जुनी मोरगाव मतदारसंघात ६८ टक्केवर मतदान झाले आहे. तर त्या तुलनेत शहरी भागात ६४ टक्केच्यावर मतदान झाले आहे. त्यामुळे शहरी भागात मतदानाप्रती मतदारांमध्ये निरूत्साह दिसून आला. या निरूत्साहामागील नेमके कारण काय हे शोधण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
मतदार वाढूनही टक्केवारीत घट
यंदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी दरम्यान जिल्ह्यातील ३५ हजारावर मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर २६ हजारावर मतदार हे १८ ते १९ वर्ष वयोगटातील आहेत. मात्र यानंतरही चारही मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी २०१४ च्या तुलनेत कमीच आहे. त्यामुळे मतदार वाढूनही मतदानाच्या टक्केवारीत घट झाल्याचे चित्र आहे.
कमी मतदानाचा फटका नेमका कुणाला?
जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, तिरोडा, गोंदिया आणि आमगाव या चारही विधानसभा मतदारसंघात ७० टक्केच्या वर मतदान झाले नाही. सत्तरीच्या आतच सर्व मतदारसंघात स्थिती असल्याने कमी प्रमाणात झालेल्या मतदानाचा नेमका फायदा कुणाला होणार ही बाब महत्त्वपूर्ण ठरणार आहे.