Maharashtra Election 2019 ; जिल्ह्यातील दिग्गजांना पराभवाची धूळ ; आघाडी व अपक्ष उमेदवारांवर मतदारांनी उधळली विजयाची फुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 06:00 AM2019-10-25T06:00:00+5:302019-10-25T06:00:12+5:30
संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष गोंदिया विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे लागले आहे होते. या मतदारसंघात भाजपचे गोपालदास अग्रवाल विरुध्द अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल असा सामना होता. अखेर अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांनी भाजपचे गोपालदास अग्रवाल यांचा २० हजार ६६६ मतांनी पराभव करुन या मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून येण्याचा इतिहास रचला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात आश्चर्यकारक निकाल लागण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. गुरूवारी (दि.२४) जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील निकालानंतर खरा ठरला. या निवडणुकीत मतदारांनी दिग्गज उमेदवारांना पराभवाची धूळ दाखविली. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व अपक्ष उमेदवारांवर मतपेटीतून विश्वास टाकीत त्यांच्यावर विजयाची फुले उधळली.
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघापैकी आमगाव,अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा या मतदार संघावर भाजपचे वर्चस्व होते. मात्र या निवडणुकीत तिरोडा मतदारसंघ वगळता भाजपला तीन मतदारसंघात दारुन पराभव पत्थकारावा लागला. त्यामुळे भाजपला या निवडणुकीत अति आत्मविश्वास आणि आयारामांना दिलेली संधी भोवल्याची चर्चा निकालानंतर मतदारांमध्ये होती. तिरोडा मतदारसंघातून भाजपचे विजय रहांगडाले यांनी ७५ हजार ७७३ मते घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुड्डू बोपचे यांचा २५ हजार ५०८ मतांनी पराभव केला. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार दिलीप बन्सोड यांनी ३३ हजार मते घेत विजय रहांगडाले यांचा विजयाचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे ते या मतदारसंघात जार्इंट किलर ठरले.
संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष गोंदिया विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे लागले आहे होते. या मतदारसंघात भाजपचे गोपालदास अग्रवाल विरुध्द अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल असा सामना होता. अखेर अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांनी भाजपचे गोपालदास अग्रवाल यांचा २० हजार ६६६ मतांनी पराभव करुन या मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून येण्याचा इतिहास रचला. तर काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या स्थानी होता. यापूर्वी या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार निवडून आलेला नाही. अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापूरे यांनी भाजपचे माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचा ७१८ मतांनी पराभव करीत त्यांची विजयाची हॅट्रिक रोखली. आघाडीमुळे या मतदारसंघात मतांचे विभाजन टळल्याने चंद्रिकापुरे यांचा विजयाचा मार्ग सुकर केला.
आमगाव मतदारसंघातून काँग्रेसचे सहषराम कोरोटे यांनी भाजपचे विद्यमान आ. संजय पुराम यांचा ७ हजार ३३५ मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे शेवटच्या फेरीपर्यंत सहषराम कोरोटे आणि संजय पुराम यांच्यात चांगलीच चूरस झाली. त्यामुळे कधी पुराम पुढे तर कधी कोरोटे मागे असा सामना रंगला होता. अखेर कोरोटे यांनी ७ हजार ३३५ मतांनी पुराम यांचा पराभव करुन विजय मिळविला. तर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार रामरतन राऊत यांचा प्रभाव दिसला नाही.
हॅट्ट्रिक आणि इतिहासाची हुलकावणी
गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार गोपालदास अग्रवाल हे चौथ्यांदा निवडणूक रिंगणात होते. ते निवडून आले असते तर सलग चौथ्यांदा निवडून येत इतिहास स्थापन करण्याची संधी होती.मात्र अपक्ष उमेदवारामुळे ते स्वप्न भंगले.
अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार माजी सामाजिक न्यायमंत्री हे तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापुरे यांनी विजय संपादन करीत बडोले राजकुमार बडोले यांचे विजयाची हॅट्रिक रोखत या मतदारसंघात प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे खाते उघडले.
ईव्हीएमचे लॉक न उघडल्याने समस्या
अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू असताना पाचव्या फेरीत एका ईव्हीएम मशिनचे लॉक उघडले नाही. परिणामी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी व्हीव्हीटी पॅटच्या पावत्या मोजणी करण्याचा निर्णय घेतला.
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीला सकाळी ८ वाजतापासून सुरूवात झाली. बॅलेट पेपरच्या मतमोजणीने सुरूवात झाली. यात सुरुवातीला ज्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. तीच आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम होती.
दोन मतदारसंघात अंतिम फेरीपर्यंत चूरस
आमगाव आणि अर्जुनी मोरगाव मतदारसंघात अंतीम फेरीपर्यंत प्रमुख पक्षाच्या उमेदवारांमध्ये चूरस पाहयला मिळाली. आमगाव मतदारसंघात कधी काँग्रेसचे सहषराम कोरोटे पुढे तर कधी भाजपचे संजय पुराम पुढे होते. मात्र यात अखेर सहषराम कोरोटे यांनी बाजी मारली.
गोंदिया विधानसभा मतदारसंघात हा मतदारसंघ अस्तीत्वात आल्यापासून अपक्ष उमेदवार निवडून आला नव्हता. मात्र यंदा अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांनी विजय मिळवित या मतदारसंघात नवा इतिहास रचला.