Maharashtra Election 2019 ; दिग्गज दाखल करणार उमेदवारी अर्ज आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 06:00 AM2019-10-04T06:00:00+5:302019-10-04T06:00:19+5:30
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आघाडीचे उमेदवार मनोहर चंद्रिकापूरे सकाळी १० वाजता अर्जुनी मोरगाव येथील प्रसन्ना सभागृहातून रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी त्यांच्यासोबत खा.प्रफुल्ल पटेल, माजी आ.राजेंद्र जैन तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार हा शेवटचा दिवस असून सर्वच राजकीय पक्षांचे दिग्गज उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे चारही मतदारसंघात उमेदवारांकडून केल्या जाणाऱ्या शक्ती प्रदर्शनामुळे उपविभागीय कार्यालयासमोर गर्दी होणार आहे.
२७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र युती आणि आघाडीच्या उमेदवारांच्या याद्या उशीरा जाहीर झाल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांना उशीरा झाला. त्यातच सुट्या आल्या होत्या त्यामुळे सुध्दा या प्रक्रियेला थोडा विलंब झाला होता. त्यातच शुक्रवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटचा दिवस असल्याने सर्व राजकीय पक्षांसह इतर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केली. अर्जुनी मोरगाव मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राजकुमार बडोले हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. सकाळी १० वाजता अर्जुनी मोरगाव येथील दुर्गा चौकातून त्यांच्या रॅलीला सुरूवात होणार असून यानंतर ते उपविभागीय कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी आ.केशव मानकर, खुशाल बोपचे, नेतराम कटरे उपस्थित राहणार आहेत. गोंदिया विधानसभा क्षेत्राचे भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल शहरातील सर्कस मैदान येथून सकाळी १०.३० वाजता रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
या वेळी त्यांच्यासह पालकमंत्री परिणय फुके, भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, गोंदिया विधानसभेचे प्रभारी खोमेश रहांगडाले, नगराध्यक्ष अशोक इंगळे, भाजप जिल्हा महिलाध्यक्ष भावना कदम, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, माजी आ.रमेश कुथे उपस्थित राहणार आहेत. तर तिरोडा विधानसभेचे भाजपचे उमेदवार विजय रहांगडाले सकाळी ११ वाजता मातोश्री लॉन येथून रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी त्यांच्यासोबत भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आघाडीचे उमेदवार मनोहर चंद्रिकापूरे सकाळी १० वाजता अर्जुनी मोरगाव येथील प्रसन्ना सभागृहातून रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी त्यांच्यासोबत खा.प्रफुल्ल पटेल, माजी आ.राजेंद्र जैन तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहतील. तर आमगाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार सहषराम कोरोटे हे दुपारी १ वाजता देवरी येथील धुकेश्वरी मंदिर येथून रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.या वेळी त्यांच्यासोबत खा.प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री भरत बहेकार, काँग्रेस जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी उपस्थित राहतील. गोंदिया मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून अमर वऱ्हाडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून ते शुक्रवारी रॅली काढून काँग्रेस उमेदवारी अर्ज दाखल करतील. या वेळी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहतील.
निवडणूक विभागाची धावपळ
शुक्रवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यातच सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार शक्ती प्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे निवडणूक आणि पोलीस विभागाची सुध्दा धावपळ होणार आहे. त्यामुळे वेळेवर कुठली धांदल होऊ नये यासाठी प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले आहे.
अमर वऱ्हाडे यांना काँग्रेसची उमेदवारी
गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचा उमेदवार कोण याची चर्चा मागील तीन चार दिवसांपासून होती. मात्र गुरूवारी रात्री काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत अमर वऱ्हाडे यांना गोंदिया विधानसभेची उमेदवारी देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे यावरुन सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्ण विराम लागला आहे.