Maharashtra Election 2019 ; बंडखोरीमुळे चुरशीची आणि काट्याची लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 06:00 AM2019-10-13T06:00:00+5:302019-10-13T06:00:08+5:30
लोकसभा निवडणुकी दरम्यानच विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी तयारी सुरू केली होती. यासाठी त्यांनी आपल्या मतदारसंघातून आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य कसे मिळवून देता येईल याकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले. यात काहींना यश सुध्दा आले. त्यामुळे त्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची खात्री होती.
अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अर्जुनी मोरगाव मतदारसंघ वगळता जिल्ह्यातील उर्वरित तीन्ही मतदारसंघात बंडखोरांचे आव्हान कायम असल्याने या मतदारसंघामध्ये चुरशीची आणि काट्याची लढत होण्याची शक्यता आहे. पक्षातीलच बंडखोरांनी निवडणुकीत उमेदवारी कायम ठेऊन आव्हान उभे टाकल्याने मतांचे विभाजन होणे अटळ आहे. त्यामुळे मतांचा विभाजनाचा फटका नेमका कुणाला बसतो आणि कुणाचे विजयाचे समीकरण बिघडते हे सुध्दा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकी दरम्यानच विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी तयारी सुरू केली होती. यासाठी त्यांनी आपल्या मतदारसंघातून आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य कसे मिळवून देता येईल याकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले. यात काहींना यश सुध्दा आले. त्यामुळे त्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची खात्री होती. मात्र तसे न झाल्याने इच्छुक उमेदवारांचा हिरमोढ झाला त्यामुळे त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली. सर्वच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बंडखोरांना शांत करण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न केले. मात्र अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ वगळता इतर मतदारसंघात यश आले नाही.
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात बंडखोरी न झाल्याने भाजप-सेना युतीचे उमेदवार राजकुमार बडोले आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनोहर चंद्रिकापूरे यांच्यात चुरशीची आणि काट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पक्षाचे उमेदवार किती मते घेतात यावर या दोन्ही पक्षाच्या उमेदवाराच्या विजयाची आघाडी ठरणार आहे.
गोंदिया विधानसभा मतदारसंघात भाजप-सेना युतीचे अधिकृत उमेदवार गोपालदास अग्रवाल आणि भाजपचे बंडखोर उमेदवार विनोद अग्रवाल यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसचा उमेदवार नवखा असल्याने आणि या दोन्ही उमेदवारांच्या तुलनेत जनसंर्पकाचा अभाव असल्याने तिसºया क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे. बंडखोर उमेदवारामुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिहेरी लढतीचे चित्र राहू शकते.आमगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी आ. रामरतन राऊत यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने येथे सुध्दा तिहेरी सामना रंगण्याची शक्यता आहे.
भाजपचे संजय पुराम आणि काँग्रेसचे सहषराम कोरोटे या दोघांनी मागील पाच वर्षांपासून मतदारसंघात जनसंर्पक कायम ठेवला. त्यामुळे खरी लढत जरी कोरोटे आणि पुराम यांच्यात असली तरी या दोघांच्या विजयाचे समीकरण मात्र रामरतन राऊत नेमकी किती मते घेतात यावरुन ठरू शकते. तिरोडा मतदारसंघात सुध्दा असेच चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने माजी आ.दिलीप बन्सोड यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्धार करीत निवडणूक रिंगणात उडी घेतली. तर भाजपने विद्यमान आ.विजय रहांगडाले यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त करीत संधी दिली. तर राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले गुड्डू बोपचे यांना उमेदवारी दिली.
त्यामुळे या मतदारसंघात रहांगडाले, बोपचे, बन्सोड असा तिहेरी सामना रंगण्याची चिन्हे आहे. यामुळे मतांचे सुध्दा विभाजन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असून तसे झाल्यास विजयाचे अंतर फार कमी मतांचे राहील. त्यामुळे हे अंतर कुणासाठी अनुकुल होईल हे २४ तारखेलाच स्पष्ट होईल. एकंदरीत अर्जुनी मोरगाव, तिरोडा आणि आमगाव विधानसभा मतदारसंघात तिहेरी आणि काट्याची लढत होण्याची शक्यता आहे.
प्रचाराचा ज्वर वाढला
विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबरला मतदान होणार आहे.त्यामुळे प्रचारासाठी आता केवळ ७ दिवस शिल्लक आहे. त्यामुळे सभा, बैठका, पदयात्रा, रोड शोच्या माध्यमातून उमेदवार अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे चारही मतदारसंघात प्रचाराचा ज्वर वाढल्याचे चित्र आहे.
कार्यकर्त्यांची आकडेमोड सुरू
निवडणुकीत उमेदवारांची सर्वात मोठी ताकद आणि ऊर्जा ही कार्यकर्तेअसतात. आपल्या पक्षाचा उमेदवार कसा विजय होईल, मतांचे विभाजन झाल्यास आपल्या पक्षाच्या उमेदवाराला कशी मदत होईल, किती टक्के मते मिळतील याचे समीकरण याचे गणित आणि समीकरण जुळविण्याच्या कामात व्यस्त आहेत. आकडेमोड करुन आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा विजयाचा दावा करीत आहे.
जुन्यांना साथ की नव्यांना संधी
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जिल्ह्यातील चारही विद्यमान आमदारांनी संधी दिली आहे. गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार गोपालदास अग्रवाल हे चौथ्यांदा विजयाचा इतिहास रचणार का? अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राजकुमार बडोले विजयाची हॅट्रीक साधणार हे सुध्दा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर तिरोडा आणि आमगाव मतदारसंघातील मतदार विद्यमान आमदारांना पुन्हा साथ देतात की नवीन चेहऱ्यांना संधी देतात याची सुध्दा उत्सुकता कायम आहे.