Maharashtra Election 2019 ; विक्रमासाठी विद्यार्थ्यांना धरले वेठीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 06:00 AM2019-10-17T06:00:00+5:302019-10-17T06:00:25+5:30
गावोगावी विद्यार्थी, नागरीक, बचतगटांच्या महीला व गावकरी सहभागी झाले होते. या मोहीमेत सर्वच शाळांच्या जवळपास २९ हजार विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेण्यात आले. सकाळी ७.३० वाजपासून हे विद्यार्थी रस्त्याच्या कडेला श्रृंखला तयार करुन उभे होते. विद्यार्थ्यांना कुठला त्रास होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. मात्र या कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक विभाग आणि जिल्हा प्रशासनातर्फे विविध जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत. याच अंतर्गत जिल्हा प्रशासनाने बुधवारी (दि.१६) गोंदिया ते काटी विद्यार्थ्यांची मानवी श्रृखंला तयार करुन मतदार जागृती करुन विक्रम स्थापन करण्याचा प्रयत्न केला.
मात्र या मानवी श्रृंखलेत सहभागी विद्यार्थ्यांना सकाळी ७.३० वाजतापासून रस्त्यावर उभे करण्यात आले. जवळपास दीड तास विद्यार्थ्यांसाठी ना पाण्याची ना बिस्कीटची सोय केली होती.
त्यामुळे विक्रमासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याच्या प्रकाराबाबत शिक्षकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकाºयांनी याची दखल घेत पाणी आणि बिस्कीटची सोय करुन दिली. मात्र या प्रकाराबद्दल पालक आणि शिक्षकांनी रोष व्यक्त केल्याने चांगल्या उपक्रमाला गालबोट लागले.
येत्या २१ ऑक्टोबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी मतदार जागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम व नाविण्यपूर्ण कार्यक्र माचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून बुधवारी गोंदिया येथील पतंगा मैदानापासून ते काटी या गावापर्यंत मानवी श्रृंखला तयार करण्यात आली.ही मानवी श्रृंखला जवळपास २९ कि.मी. अंतराची होती. यामध्ये गावोगावी विद्यार्थी, नागरीक, बचतगटांच्या महीला व गावकरी सहभागी झाले होते.
या मोहीमेत सर्वच शाळांच्या जवळपास २९ हजार विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेण्यात आले. सकाळी ७.३० वाजपासून हे विद्यार्थी रस्त्याच्या कडेला श्रृंखला तयार करुन उभे होते. विद्यार्थ्यांना कुठला त्रास होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. मात्र या कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले.
विद्यार्थ्यांसाठी पाणी आणि साधी बिस्कीटाची सुध्दा सोय केली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना उपाशीच दीड तास उभे राहावे लागले.
दरम्यान या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी याची जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांच्याकडे तक्रार केली.विद्यार्थ्यांना काही कमी जास्त झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेत जवाबदारी सोपविलेल्या कर्मचाऱ्यांना चांगलेच फटकारले.
तसेच चार ते पाच कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून २४ तासात उत्तर देण्यास सांगितले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरीत पाणी आणि बिस्कीटाची विद्यार्थ्यांची सोय करुन दिली. मात्र हा प्रकार पालकांना कळल्यानंतर विक्रमासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
२९ कि.मी.ची मानवी श्रृंखला
गोंदिया येथील पतंगा मैदान येथून सुरु झालेली मानवी श्रृंखला फुलचुर नाका, मनोहर चौक, जयस्तंभ चौक, नेहरु चौक, कालेखॉ चौक, पाल चौक, नमाद महाविद्यालय, कुडवा नाका, गुंडीटोला,जब्बारटोला, पांढराबोडी, लईटोला, गिरोला, सतीबोडी, निलज, दासगाव, तेढवा, मरारटोला ते काटी अशी २९ कि.मी.ची मानवी श्रृंखला तयार करण्यात आली होती.
जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी
जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी पतंगा मैदान येथे मानवी श्रृंखलेला हिरवी झेंडी दाखिवली. या वेळी गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निरिक्षक शौकत अहमद परे, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, स्वीपचे नोडल अधिकारी एस.ई.ए.हाश्मी, स्वीपचे सहायक नोडल अधिकारी राजकुमार हिवारे यांची प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी या मानवी श्रृंखलेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधून आपल्या पालकांना २१ ऑक्टोबरला मतदानाचा करण्याचा आग्रह धरला.