राज्यातील सत्तासमीकरणाचे नगर परिषद निवडणुकांवर परिणाम; मोर्चेबांधणीला लागला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2022 03:40 PM2022-06-29T15:40:29+5:302022-06-29T16:31:00+5:30

शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. या घडामोडींचे पडसाद जिल्ह्यात देखील उमटत असून नगर परिषद निवडणुकीसाठी सुरु केलेल्या माेर्चेबांधणीलासुद्धा यामुळे ब्रेक लागल्याचे चित्र आहे.

maharashtra political crisis impact on Municipal Council Elections | राज्यातील सत्तासमीकरणाचे नगर परिषद निवडणुकांवर परिणाम; मोर्चेबांधणीला लागला ब्रेक

राज्यातील सत्तासमीकरणाचे नगर परिषद निवडणुकांवर परिणाम; मोर्चेबांधणीला लागला ब्रेक

Next
ठळक मुद्देनिर्णयाकडे सर्वांच्या नजरा : नेतेही वेट ॲन्ड वॉचच्या भूमिकेत

गोंदिया : जिल्ह्यात पुढील दोन महिन्यात गोंदिया आणि तिरोडा नगर परिषदेची निवडणूक होऊ घातली आहे. यासाठी मोर्चेबांधणीला सर्वच राजकीय पक्षांनी सुरुवात केली होती. मात्र मागील आठवडाभरापासून शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. या घडामोडींचे पडसाद जिल्ह्यात देखील उमटत असून नगर परिषद निवडणुकीसाठी सुरु केलेल्या माेर्चेबांधणीलासुद्धा यामुळे ब्रेक लागल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील राजकारणावर पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांना फार महत्त्व आहे. त्यामुळे खासदार, आमदार व स्थानिक नेते यात अधिक रुची घेतात. गोंदिया आणि तिरोडा नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १५ फेब्रुवारीला पूर्ण झाला. त्यानंतर नगर परिषदेत प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली, तर आमगाव नगर परिषदेचा मुद्दा न्यायप्रविष्ट असला तरी या ठिकाणी निवडणुकीच्या अनुषंगाने प्रक्रियेला प्रशासनाने सुरुवात केली आहे. आमगाव नगर परिषदेवर शिक्कामोर्तब झाल्यास या ठिकाणी प्रथमच नगर परिषदेसाठी निवडणूक होईल. त्यामुळे पहिला नगराध्यक्षाचा मान कोणत्या पक्षाला मिळणार यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ पाहायला मिळण्यासाठी शक्यता आहे. नगर परिषद निवडणुकीसाठी या ठिकाणी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असून, संभाव्य उमेदवारांची यादीसुध्दा तयार केली आहे. काही भावी उमेदवार आतापासूनच उमेदवारांच्या गाठीभेठी घेत असल्याचे चित्र होते. तर गोंदिया नगर परिषदेची निवडणूक यंदा अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यासह अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनीसुध्दा यात रुची घेतली असल्याने ही निवडणूक चांगलीच रंगतदार होण्याची शक्यता आहे.

भावी उमेदवारांनी गाठी भेटी केल्या बंद

राज्यातील महाविकास आघाडी सरकार राहणार की कोसळणार यावरून सध्या अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील आमदार, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये सुध्दा काहीशी अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी नगर परिषदेच्या भावी उमेदवारांनी सुरु केलेल्या गाठीभेटीसुद्धा पूर्णपणे बंद झाल्याचे चित्र आहे.

सभा बैठकांचे सत्र थंडावले

जिल्ह्यात आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे दौरे, सभा, बैठकांचे सत्र सुरु झाले होते. त्यामुळे नगर परिषद निवडणुकांचे पडघम वाजल्याचे चित्र होते. मात्र मागील आठ दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे सभा, बैठकांचे सत्र बंद झाले असून सर्वांनीच वेट ॲन्ड वॉचची भूमिका घेतली आहे.

Web Title: maharashtra political crisis impact on Municipal Council Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.