देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान महत्वपूर्ण - पालकमंत्री राजकुमार बडोले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 01:37 PM2019-05-01T13:37:34+5:302019-05-01T13:39:42+5:30
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 59 वा वर्धापन दिन साजरा
गोंदिया - महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक समाजसुधारकांनी आपल्या आयुष्याचं समर्पण करुन अनेक समाजसुधारणा घडवून आणल्या. त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच राज्याची वाटचाल सुरु आहे. महाराष्ट्राने गेल्या 59 वर्षात सर्वच क्षेत्रात नेत्रदिपक कामगिरी करुन विविध क्षेत्रात देशात अव्वल स्थान पटकाविले असून देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान महत्वपूर्ण आहे असे गौरोदगार पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी काढले.
पोलीस मुख्यालयाच्या कारंजा येथील मैदानावर 1 मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना बडोले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक विनीता साहू, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस.ई.ए.हाश्मी, अपर पोलीस अधीक्षक संदिप आटोळे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.रुखमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बडोले पुढे म्हणाले, धर्मसुधारणांपासून ते समतेच्या चळवळीपर्यंत आणि देशाच्या प्रत्येक नव्या विधायक उपक्रमात महाराष्ट्र सदैव अग्रभागी राहिला आहे. या राज्याला संस्कृतीची, पराक्रमाची, त्यागाची, तेजाची आणि राष्ट्रप्रेमाची परंपरा आहे. परकीयांच्या आक्रमणापासून या भूमीला मुक्त करुन छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा रयतेचे राज्य स्थापन केले. महाराष्ट्र हे पर्यटनाच्या दृष्टीने समृध्द राज्य आहे. राज्यात विस्तीर्ण सागर किनारे, दाट वने, वन्यप्राणी, ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे विपुल प्रमाणात आहे.
संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, संत गोरा कुंभार, संत सावता माळी, संत चोखामेळा, संत जनाबाई अशा संतांची मांदियाळीच महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीला लाभली असल्याचे सांगून बडोले पुढे म्हणाले, गोंदिया जिल्ह्यातील कचारगड हे देशातील कोट्यवधी आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थान आहे. देशातील विविध भागातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने फेब्रुवारी महिन्यात माघ पोर्णिमेला नतमस्तक होण्यासाठी कचारगडला येतात. शतकापूर्वीच छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकारामुळेच मागासवर्गीयांना हक्काचे आरक्षण मिळाले. दरवर्षी आषाढी कार्तिकेला पंढरीची वारी निघते. चांदयापासून ते बांध्यापर्यंतचे भाविक स्त्री-पुरुष पंढरीच्या वारीत सहभागी होतात असा हा लोकोत्सव जगाच्या पाठीवर एकमेवाद्वितीय असा आहे. शेकडो वर्षामधल्या संत वाङमयाच्या रुपानं झालेलं विचारमंथन आणि भक्तीच्या धाग्यानं एकत्र बांधला गेलेला समाज यामुळे आध्यात्मिक लोकशाही दृढ करणारी मार्गदर्शक यंत्रणा म्हणून या वारीकडे बघितले जात असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील नाटकवेड्या मंडळींना लोकाश्रयाबरोबरच आता राजाश्रयही मिळू लागल्याचे सांगून बडोले म्हणाले, छोट्या-छोट्या एकांकीकेपासून ते व्यावसायिक लोकप्रिय नाटकांपर्यंत रंगभूमीची उपासना सतत सुरु असल्याचे चित्र आहे. प्रायोगिक रंगभूमी, संगीत रंगभूमी, हौशी रंगभूमी, लोकरंगभूमी अशा विविध प्रकारातील नाट्यप्रतिभा विविध महोत्सवांमुळे आणि संमेलनामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात चांगलीच बहरु लागली आहे. पुर्व विदर्भाची रंगभूमी ही झाडीपट्टी रंगभूमी म्हणून ओळखली जाते. गोंदिया जिल्ह्यात सुध्दा झाडीपट्टी रंगभूमीचे अनेक कार्यक्रम आयोजित केले जात असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
महाराष्ट्र दिनासोबतच हा दिवस जगभर कामगार दिन म्हणून आणि गोंदिया जिल्ह्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जात असल्याने पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील जनतेला तसेच कामगारांना शुभेच्छा दिल्या. प्रारंभी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी ध्वजारोहण करुन परेडचे निरीक्षण केले. पुरुष व महिला पोलीस दल, दंगा नियंत्रण पथक, पोलीस वाहतूक शाखा, पुरुष व महिला होमगार्ड पथक, स्काऊट-गाईड पथक, पोलीस बँड पथक, पोलीस श्वान पथक, दामिनी पथक, अग्नीशमन दल यांनी परेड संचलन केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, सुनिल कोरडे, जि.प.चे मुख्य लेखा वित्त अधिकारी मडावी. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.वासनिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राठोड, भांडारकर, कार्यकारी अभियंता विश्वकर्मा, वैरागकर, जिल्हा नियोजन अधिकारी मृणालिनी भूत, जिल्हा खनिकर्म अधिकारी राजविलास गजभिये, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गाणार,चव्हाण, लेखाधिकारी एल.एच.बाविस्कर, तहसिलदार भांडारकर, अपर तहसिलदार खरडकर यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, प्रतिष्ठीत नागरिक, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, पत्रकार बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मंजुश्री देशपांडे यांनी मानले.