महावीर स्वामींच्या जयघोषाने दुमदुमली नगरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 09:04 PM2018-03-29T21:04:59+5:302018-03-29T21:04:59+5:30
श्रमण भगवान महावीर स्वामी यांची २६१७ वी जयंती शहरात विविध कार्यक्रमांनी गुरुवारी उत्साहात साजरी करण्यात आली.
ऑनलाईन लोकमत
देवरी : श्रमण भगवान महावीर स्वामी यांची २६१७ वी जयंती शहरात विविध कार्यक्रमांनी गुरुवारी उत्साहात साजरी करण्यात आली. नॅशनल हायवेवरील जैन मंदिरातून काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. मिरवणुकीतील महावीर भगवंताच्या जयघोषाने शहर दुमदुमून गेले.
भगवान महावीर यांच्या २६१७ व्या जन्म कल्याणक महोत्सवांतर्गत गुरुवारी सकाळी जैन मंदिरात पूजा अर्चना व आरती करण्यात आली. शांतीधाराची बोली नरेशकुमार अजमेरा तर ध्वजारोहणची बोली नरेंद्र पांड्याद्वारे बोलण्यात आली. पूजा व अभिषेकानंतर १० वाजता महावीर स्वामींच्या शोभायात्रेला मंदिरापासून सुरुवात झाली. सजविलेल्या वाहनात भगवान महावीर स्वामींची प्रतिमा ठेवून अत्यंत शिस्तबद्ध निघालेल्या या शोभायात्रेत भगवंतांचा जयजयकार करीत महिला पुरुषांनी भक्तीगीत सादर केले.
पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले पुरुष आणि लाल साड्या परिधान केलेल्या शेकडो महिला या शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. समाजबांधवांनी एकमेकांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा देत एकतेचे दर्शन घडविले. जैन मंदिरापासून निघालेली शोभायात्रा नॅशनल हायवे, दुर्गा चौक, कारगील चौक, गणेश चौक ते जैन मंदिर येथे समाप्त झाली. त्यानंतर मंदिरात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त जैन मंदिराला आकर्षकरित्या सजविण्यात आले होते. संध्याकाळी आरती व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.