महावितरणला १४ लाखांचा ‘शॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2017 02:05 AM2017-06-08T02:05:12+5:302017-06-08T02:05:12+5:30
२९ मे रोजी आलेल्या वादळीवाऱ्याने जिल्ह्यात चांगलाच कहर केला असून मानवी जीवन विस्कळीत करतानाच पिकांचेही नुकसान केले आहे.
वादळीवाऱ्याने दिला झटका : पोल व वाहिन्या तुटल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : २९ मे रोजी आलेल्या वादळीवाऱ्याने जिल्ह्यात चांगलाच कहर केला असून मानवी जीवन विस्कळीत करतानाच पिकांचेही नुकसान केले आहे. नुकसानीच्या या फटक्यातून महाराष्ट्र वीज वितरण कंपनीही सुटली नसून या वादळीवाऱ्यामुळे महावितरणला सुमारे १४.५३ लाखांचा फटका बसला आहे.
यंदा उन्हाने चांगलेच चटके दिले व त्यावर अवकाळी पावसाने थोडाफार थंडावा दिला. मे महिन्यात २९ तारखेला वादळीवाऱ्याने चांगलाच कहर केला. या पाऊस व वादळीवाऱ्यामुळे कोठे झाडे पडली, तर कोठे घरांची पडझड झाली. तर पावसाने पिकांची नासाडी करून सोडली. अवकाळी पाऊस व वादळीवाऱ्याने वीज वितरण कंपनीलाही आपल्या पाशात घेतले आहे. २९ मे रोजीच्या वादळीवाऱ्यामुळे वीज कंपनीचे सुमारे १४.५३ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. वादळीवाऱ्यामुळे कोठे वीज पोल पडले तर कोठे वाहिन्या तुटल्या. विद्युतरोहित्रांतही बिघाड आला व अवघा जिल्हा अस्तव्यस्त झाला होता.
या नुकसानीमुळे वीज वितरण कंपनीची चांगलीच पंचाईत झाली असून दुरूस्तीसाठी कसरत करावी लागली.
विशेष म्हणजे हा तर उन्हाळ््यातील अवकाळी पाऊस व वादळीवाऱ्याचा कहर व त्यापासून झालेले नुकसान आहे. तर मान्सून सुरू झाल्यास वादळीवारा व पावसाने नेहमीच अशाप्रकारचे बिघाड येतात. त्यामुळे आता मान्सूनमध्ये ही महावितरणला यासाठी तयार रहावेच लागणार आहेच. त्यातही यंदा महावितरणला फक्त १४ लाखांचेच नुकसान सहन करावे लागले. तर मागील वर्षी वादळीवाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा कोटींच्या घरात गेल्याचीही माहिती आहे.
१३.२ किमी वाहिनी तुटली
पोल तुटले असतानाच जिल्ह्यात १३.२ किमी. वीज वाहिन्या तुटल्या आहेत. यात ६.५६ किमी. उच्चदाब व ६.४६ किमी. लघुदाब वाहिन्या आहेत. विभागनिहाय बघितल्यास, गोंदिया विभागात ५ किमी. उच्चदाब व १.३ किमी. लघुदाब तर देवरी विभागात १.५६ किमी. उच्चदाब व ५.१६ किमी. लघुदाब वाहिन्या तुटल्या आहेत. यातून एकूण सुमारे २.१२ लाखांचे नुकसान झाले आहे.
३ विद्युत रोहित्रांमध्ये बिघाड
वादळीवाऱ्याच्या कहरामुळे पोल व वाहिन्या तुटल्या असतानाच विद्युतरोहित्रही यापासून सुटले नाहीत. यामध्ये देवरी विभागात ३ रोहित्रांत बिघाड आला होता. अशाप्रकारे रोहित्रांमधील बिघाडामुळे कंपनीला २.८५ लाखांचे नुकसान झाले आहे. यावर वीज वितरण कंपनीकडून पोल व रोहीत्र बदलण्यात आले आहेत.
८३ खांब पडले
वादळीवाऱ्यामुळे जिल्ह्यातील ८३ पोल पडले आहेत. यात १६ उच्चदाब व ६७ लघुदाब पोल आहेत. विभागनिहाय बघितल्यास, गोंदिया विभागात ७ उच्चदाब व १३ लघुदाब तर देवरी विभागात ९ उच्चदाब व ५४ लघुदाब पोल पडले आहेत. अशाप्रकारे पोल तुटल्याने महाविरणला सुमारे ९.५६ लाखांचे नुकसान झाले आहे.