महावितरण थकबाकीदारांना देणार 'अभय' : व्याज आणि विलंब माफ करून वीज जोडणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 02:46 PM2024-09-09T14:46:33+5:302024-09-09T14:47:24+5:30
थकबाकी भरल्यास मिळणार जोडणी : ३० नोव्हेंबरपर्यंत घेता येणार लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बिलाची रक्कम न भरल्यामुळे आता महावितरणकडून लगेच वीज जोडणी कापली जात आहे. परिणामी अशा कुटुंबांना अंधारातच दिवस काढावे लागतात; मात्र त्यांच्या घरातही विजेचा प्रकाश व्हावा या उद्देशातून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून 'अभय योजना' राबविली जात आहे. यांतर्गत थकबाकीदाराने थकबाकीची मुद्दल भरल्यास त्यावरील व्याज आणि विलंब माफ करून वीज जोडणी दिली जाणार आहे.
अन्न, वस्त्र व निवारा सोबतच आज घरात वीज असणे अत्यंत गरजेचे आहे. घरात वीज नसल्याने कुटुंबीयांना किती समस्यांचा सामना करावा लागतो याबाबत ज्यांच्या घरात वीज नाही तेच चांगल्याने सांगू शकतात; मात्र असे असतानाही कित्येक वीज ग्राहक त्यांच्याकडील वीज बिलाची रक्कम भरत नाही.
महावितरणकडून वारंवार सांगूनही त्यांना काहीच फरक पडत नसल्याने अशा थकबाकीदारांची वीज जोडणी महावितरणकडून कापली जाते; मात्र यानंतर त्या कुटुंबाला किती समस्यांचा सामना करावा लागतो हे सांगायची गरज नाही. अशात संबंधित थकबाकीदार वीज ग्राहकाला एक संधी देता यावी यासाठी महावितरणने 'अभय योजना' सरू केली आहे
१ सप्टेंबरपासून ही योजना सुरू करण्यात आली असून येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वर्गवारीतील थकबाकीदार वीज ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. महावितरणची ही योजना नक्कीच थकबाकीदारांसाठी लाभदायी ठरणार असल्याने जास्तीत जास्त थकबाकीदारांनी योजनेचा लाभ घ्यावा असे कार्यकारी अभियंता कांबळे यांनी कळविले आहे.
असे आहे योजनेचे स्वरूप
- या योजनेंतर्गत घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वर्गवारीतील थकबा- कीदार वीज ग्राहकांना मुद्दल बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के सहा हप्त्यात भरायची सोय आहे.
- जे घरगुती, व्यावसायिक इत्यादी लघुदाब ग्राहक एकरकमी थकीत बिल भरतील त्यांना १० टक्के सवलत दिली जाणार आहे. तर उच्चदाब, औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत दिली जाणार आहे.
परिमंडळातील ३५,६२७ थकबाकीदारांसाठी संधी
परिमंडळात ३५ हजार ६२७ थकबाकीदार या योजनेंतर्गत पात्र असून त्यांच्यासाठी ही योजना एक सुवर्णसंधी ठरणार आहे. यामध्ये जिल्हानिहाय बघितल्यास गोंदिया जिल्ह्यात २० हजार ४१० पात्र ग्राहक असून त्यांच्यावर १२.७७ कोटी मूळ थकबाकी तर १.९८ कोटी रुपये व्याज आणि विलंब आकाराचे देणे निघते. तर भंडारा जिल्ह्यातील १५ हजार २१७ ग्राहक पात्र असून त्यांच्यावर ८०.९६ कोटींची मूळ थकबाकी असून ४०.२८ कोटी रुपयांचे व्याज आणि विलंब आकाराचे देणे निघते.