सडक अर्जुनी येथील नगरसेवक महेंद्र वंजारी अखेर अपात्र घोषित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 04:43 PM2024-10-17T16:43:12+5:302024-10-17T16:44:13+5:30

शासकीय जागेवर अतिक्रमणाची तक्रार : जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई

Mahendra Vanjari, a corporator from Sadak Arjuni, was finally declared ineligible | सडक अर्जुनी येथील नगरसेवक महेंद्र वंजारी अखेर अपात्र घोषित

Mahendra Vanjari, a corporator from Sadak Arjuni, was finally declared ineligible

लोकमत न्यूज नेटवर्क 
सडक-अर्जुनी :
येथील नगरपंचायतीच्या निवडणुका २०२२ मध्ये पार पडल्या. त्यात नगरसेवक महेंद्र जयपाल वंजारी हे प्रभाग क्रमांक १ मधून निवडून आले होते. त्यांच्या विरोधात शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी महेंद्र वंजारी यांना नगरसेवक पदावरून अपात्र घोषित केले आहे.


नगरसेवक महेंद्र वंजारी यांनी नगरपंचायत सडक अर्जुनी येथील गट क्रमांक १८० मधील १०५ चौरस मीटर शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती औद्योगिक नागरिक अधिनियम १९६५ चे कलम ४४ अन्वये, नगरपंचायतीच्या सदस्य पदावरून अपात्र ठरविण्याची मागणी अर्जदार भोजराज रघुनाथ मसराम यांनी जिल्हाधिकारी प्रजित नायर व नगरविकास विभागाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेऊन आणि उपविभागीय भूमी अभिलेख सडक अर्जुनी यांनी भूमापन क्रमांक एक संस्थेचे मोजणी करून महेंद्र वंजारी यांनी १०५ मीटर चौरस मीटर शासकीय जागेवर अतिक्रमण केले असल्याचे दस्तऐवज सादर केले. सर्व कागदपत्रे तपासून व पुराव्याच्या आधारावर महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ कलम ४४ नुसार महेंद्र जयपाल वंजारी यांना नगरसेवक पदावरून अपात्र घोषित केल्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रदीप नायर यांनी सडक अर्जुनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांना १५ ऑक्टोबर रोजी पत्र देऊन कळविले आहे. 


आणखी नगरसेवकांच्या अतिक्रमणाची चर्चा 
नगरसेवक महेंद्र वंजारी यांना शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी नगरसेवक पदावरून अपात्र घोषित करण्यात आले. त्यांच्यावरील कारवाई- नंतर काही नगरसेवकांनीसुद्धा अतिक्रमण केले असून त्यांच्यात भीती निर्माण झाल्याची चर्चा आहे. तर वंजारी यांच्याप्रमाणेच ज्या नगरसेवकांनी अतिक्रमण केले. त्यांच्यावरसुद्धा अपात्रतेची कारवाई होणार का असा सवाल सडक अर्जुनी शहरवासीयांकडून केला जात आहे. 

Web Title: Mahendra Vanjari, a corporator from Sadak Arjuni, was finally declared ineligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.