पथदिव्यांचा वीजपुरवठा नियमित ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:20 AM2021-07-04T04:20:14+5:302021-07-04T04:20:14+5:30
केशोरी : विद्युत वितरण कंपनीने ग्रामपंचायत हद्दीच्या गावातील पथदिव्यांच्या थकीत वीज बिलाचा भरणा ग्रामपंचायतीने त्वरित करावा म्हणून नोटीस बजावून ...
केशोरी : विद्युत वितरण कंपनीने ग्रामपंचायत हद्दीच्या गावातील पथदिव्यांच्या थकीत वीज बिलाचा भरणा ग्रामपंचायतीने त्वरित करावा म्हणून नोटीस बजावून केशोरी येथील पथदिव्यांचा वीजपुरवठा मागील आठ दिवसांपासून खंडित केला आहे. त्यामुळे पथदिव्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यात यावा यासाठी सरपंच संघटनेने पुढाकार घेतला आहे.
स्थानिक ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती कोरोनाच्या महामारीने खालावली असून जिल्हा परिषदेने पथदिव्यांचे थकीत विद्युत बिल भरण्यासाठी हात वर केले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन अडचणीत सापडले आहे. ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या १५ व्या वित्त आयोगाच्या रकमेतून पथदिव्यांच्या थकीत बिलाचा भरणा करावा अशा जिल्हा परिषदेने सूचना देऊन आपले हात झटकले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी येथील सरपंच नंदू पाटील गहाणे यांनी अर्जुनी मोरगाव तालुका सरपंच, उपसरपंच संघटनेच्या वतीने पालकमंत्री नवाब मलिक यांना निवेदन दिले. गावातील थकीत पथदिव्यांचे विद्युत बिल जिल्हा परिषदेने भरण्याची मागणी केली आहे. मागील वर्षीपासून कोरोना विषाणूच्या महामारीने अर्जुनी मोरगाव तालुक्यासह केशोरी या गावच्या ग्रामपंचायतीची करवसुली बंद आहे. या ग्रामपंचायतीला इतर कोणताही उत्पन्नाचा स्रोत नसल्यामुळे पथदिव्यांच्या थकीत विद्युत बिलाचा भरणा कसा करावा, अशा बिकट स्थितीत ग्रामपंचायत सापडली आहे. महाराष्ट्र शासनाकडून ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पथदिव्यांचा विद्युत बिलाचा भरणा करावा, असे वेळोवेळी आदेश काढून ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना देत आहे. वास्तविक पाहता ग्रामपंचायतीला फक्त गावातील पाणीपुरवठा योजनेचे विद्युत बिल या निधीतून भरावे लागते. त्याचबरोबर पथदिव्यांची केवळ दुरुस्ती व देखभाल या बाबीवर १५ व्या वित्त आयोगाची रक्कम खर्च करता येते. याची शासनाला व जिल्हा परिषदेला जाणीव असतानासुद्धा पथदिव्यांच्या थकीत विद्युत बिलाचा भरणा करण्यासंदर्भात शासन व जिल्हा परिषद तगादा लावत असल्यामुळे ही व्यथा पालकमंत्री नवाब मलिक यांना अर्जुनी मोरगाव तालुका सरपंच, उपसरपंच संघटनेने दिलेल्या निवेदनातून केली आहे.
............
...तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
१५ व्या वित्त आयोगाचा प्राप्त निधी पथदिव्यांच्या थकीत बिलापेक्षा कमी असल्याने थकीत बिलाची रक्कम भरणे कठीण आहे. त्यातच पाणीपुरवठा योजनेची बिले भरून गाव विकासाची कामे करावी लागतात. विद्युत बिलामुळे गावातील पाणीपुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. महावितरण विद्युत कंपनीने पथदिव्यांच्या थकीत विद्युत बिलाची रक्कम मागणीचा तगादा न लावता पथदिव्यांचा विद्युत पुरवठा नियमित ठेवावा या मागणीसह सरपंच नंदू पाटील गहाणे, उपसरपंच रामू बनकर यांनी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
.................
‘‘महाराष्ट्र शासन वेळोवेळी अध्यादेश जारी करून ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीवर डल्ला मारण्याच्या प्रयत्नात पथदिव्यांचे थकीत विद्युत देयक ग्रामपंचायतने भरावे, असे तुघलकी फर्मान काढून ग्रामपंचायतीवर अन्याय करीत आहे.
- नंदू पाटील गहाणे, सरपंच केशोरी