आधारकार्ड बनविण्यासाठी मतिमंद मुलीला हेलपाटे
By admin | Published: February 8, 2017 01:10 AM2017-02-08T01:10:24+5:302017-02-08T01:10:24+5:30
तिरोडा तालुक्याच्या मंदिपूर येथील एका अपंग मुलीचा आधार कार्ड नसल्याने तिला शासनाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे.
उपाययोजना करा : अनेक योजनांच्या लाभापासून वंचित
काचेवानी : तिरोडा तालुक्याच्या मंदिपूर येथील एका अपंग मुलीचा आधार कार्ड नसल्याने तिला शासनाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. ती संगणक परीक्षेपासूनही वंचित राहिली. विशेष म्हणजे आधारकार्ड तयार करताना अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याचे सांगून तिचे आधारकार्डच बनवून दिले जात नाही.
त्या अपंग मुलीचे नाव करिश्मा निलकंठ सूर्यवंशी असे आहे. तिने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. दहावी व बारावी वर्ग मानवता हायस्कूल बेरडीपार-काचे. येथून केले आहे. तिचे वडील सन २०१२ पासून मेंदिपूर, बेरडीपार, तिरोडा व चिरेखनी येथील शिबिरात तिचा आधार कार्ड बनविण्याचा प्रयत्न केला. मात्र आजपर्यंत तिचा आधारकार्ड बनलेला नाही.
ज्या ठिकाणातून आधार कार्ड बनविण्यात आला, तिथे चौकशी केल्यानंतर विविध कारणे सांगून रिजेक्ट झाल्याचे सांगण्यात येते. मतिमंद (अपंग) मुलीला आधार कार्डअभावी शैक्षणिक कार्य व समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. निराधार अपंगाचा आवेदन करण्यासाठी तलाठीसह विविध कार्यालयात अधिकाऱ्यांकडे गेल्यास आधार कार्ड नसल्याचे कारण सांगून परत पाठविले जाते, असे तिचे वडील निलकंठ सूर्यवंशी यांनी सांगितले.
चार वेळा आधार कार्ड बनविण्यात आला. मात्र चारही वेळेचे आधार कार्ड तयार झालेच नाही. तांत्रिक अडचणी सांगितल्या जातात. अशा परिस्थितीत मुलगी शिक्षण व इतर योजनांपासून वंचित राहील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर)
संगणक परीक्षेपासून वंचित
मतिमंद-अपंग मुलगी करिश्मा ही सुर कम्प्युटर एकोडी येथे जुलै २०१६ पासून संगणक प्रशिक्षण घेत आहे. आता आधार कार्ड असेल तरच ती परीक्षेत बसू शकेल अन्यथा नाही, असे तेथील शिक्षिका अश्विनी पटले यांनी कळविल्याचे करिश्माच्या वडिलांनी सांगितले. मुलीचे शैक्षणिक नुकसान होवू नये व इतर योजनांचा लाभ वेळेवर मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासन व समाजकल्याण विभागाने उपाययोजना करावी, अशी मागणी तिच्या वडिलांनी केली आहे.
शिष्यवृत्तीसुद्धा मिळाली नाही
करिश्माने अकरावी व बारावीचे शिक्षण बेरडीपार शाळेतून पूर्ण केला. या अभ्यासक्रमाची शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत शाळेतून माहिती काढली असता, शाळेमार्फत आवेदन पाठविले जातात. शिष्यवृत्ती मंजूर होवून सरळ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते. त्यामुळे आपण समाजकल्याण विभागातून माहिती काढून कळवू, असे वरिष्ठ लिपिकांनी दूरध्वनीवरून सांगितले.