शाळेत जाऊन प्रपोज करणाऱ्या मजनूला ३ महिन्यांचा सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:39 AM2021-02-27T04:39:33+5:302021-02-27T04:39:33+5:30
गोंदिया : शाळेत जाऊन सर्वांच्या समोर प्रपोज करणाऱ्या मजनूला विशेष पॉक्सो जलदगती न्यायालयाने ३ महिन्यांचा सश्रम कारावास सुनावला आहे. ...
गोंदिया : शाळेत जाऊन सर्वांच्या समोर प्रपोज करणाऱ्या मजनूला विशेष पॉक्सो जलदगती न्यायालयाने ३ महिन्यांचा सश्रम कारावास सुनावला आहे. ही सुनावणी २६ फेब्रुवारी रोजी करण्यात आली. कुवरलाल उर्फ छोटू बाबुलाल येवले (२८, ता. जि. गोंदिया) असे आरोपीचे नाव आहे.
सन २०१७ मध्ये आरोपी कुंवरलाल उर्फ छोटू याने अल्पवयीन मुलीच्या शाळेत जाऊन तिला प्रपोज केला. ती शिक्षणासाठी गेली असता आरोपीने त्या मुलीच्या मागे लागून मजनुगिरी दाखवित शाळेपर्यंत पोहोचला. पीडितेला मधल्या सुट्टीच्या वेळी भेटून “मी तुझ्यावर प्रेम करतो. तू मला आवडतेस,” असे बोलून पीडितेचा हात पकडून तिचा शाळेच्या आवारात विनयभंग केला होता. या घटनेची माहिती पीडितेने तिच्या शिक्षकांना व तिच्या आई-वडिलांना त्वरित दिली. आरोपीच्या कृत्याची तक्रार पोलीस स्टेशन रामनगर येथे दिली होती. आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ८ व १२ भादंविच्या कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय देशमुख व पोलीस हवालदार मनोहर अंबुले यांनी करून आरोपीविरुद्ध पुरावा गोळा करून न्यायालयात दोषारोप सादर केले. हे प्रकरण अतिरिक्त सह जिल्हा न्यायाधीश तसेच अतिरिक्त सत्र न्यायाधीश (विशेष पॉक्सो जलदगती न्यायालय) सुभदा डी. तुळणकर यांच्या न्यायालयात सुरू होते. या प्रकरणामध्ये अभियोजन विशेष सरकारी वकील कृष्णा डी. पारधी यांनी केले. आरोपीविरुद्ध दोष सिद्ध करण्यासाठी ९ साक्षीदार न्यायालयासमोर तपासले. न्यायालयाने २६ फेब्रुवारी रोजी आरोपीला कलम ३५४ अ अन्वये ३ महिने सश्रम कारावासाची शिक्षा व २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांचा अतिरिक्त कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयीन कामकाजासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे व अतिरिक्त अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पैरवी अधिकारी उषा हलमारे, सुनीता लिल्हारे यांनी सहकार्य केले.